पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क प्रशासन खंड कामटे, नारायण मारुतीराव आताच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या तोडीची ही जबाबदारी होती. तडफदार कामाने त्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन केली. राजकीय वादातून झालेल्या खुनाच्या एका प्रकरणात त्यांनी दाखवलेल्या कौशल्यामुळे त्यांना चांदीचे घड्याळ बहाल करण्यात आले होते. ‘ते’ घड्याळ आपल्यालाही पोलीस सेवेत प्रदीर्घ काळ प्रेरणा देत होते, असा उल्लेख नारायणराव कामटे आवर्जून करत असत. मारुतीरावांना पुढे निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. गुन्हे अन्वेषण विभागामध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांना दिल्ली दरबारी सुरक्षा सेवेसाठी प्रतिनिधी म्हणूनही पाठवण्यात आले होते. पुढे त्यांना रावसाहेब, तसेच रावबहादूर असे किताब देण्यात आले. इंडियन पोलीस पदक, किंग्ज पोलीस पदक देऊन त्यांचा सन्मान झाला. मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंगहन यांच्या हस्ते त्यांना मानाची तलवारही प्रदान करण्यात आली, अशा वारशाचे पाठबळ नारायणरावांच्या पाठीशी होते. नारायणराव यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील भावे शाळेत सुरू झाले. इंग्रजीतून त्यांनी पहिली, दुसरीचा अभ्यास केला. त्यानंतर वडिलांची नाशिक येथे बदली झाल्यामुळे तेथील शाळेतून त्यांनी चौथी इयत्ता पूर्ण केली. ठाणे येथे वडिलांची बदली होताच त्यांना तेथील शाळेत प्रवेश घ्यावा लागला. वडिलांची पुढे कैरा येथे बदली झाली. तेथे गुजराती भाषा वापरली जात असल्याने नारायणरावांचा पुढील शैक्षणिक प्रवास पुण्यातून झाला. मॅट्रिक झाल्यानंतर १९१८ मध्ये त्यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी एम.बी.ई.,बी.ए. (ऑनर्स) असे उच्च शिक्षण घेतले. नाशिक येथील (पीटीएस) पोलीस ट्रेनिंग स्कूलसाठी नारायणरावांची १८ ऑगस्ट १९२३ रोजी निवड झाली. या सुखद घटनेची नोंद घेण्यासाठी वडील हयात नसल्याची खंत त्यांना होती. दोन आठवड्यांपूर्वीच ते अचानक हे जग सोडून गेले होते. चार भारतीय आणि चार इंग्रज यांची १९२३ च्या ‘पीटीएस बॅच’साठी निवड झाली होती. त्या वेळी पोलीस दलात भारतीयांची संख्या तशी नगण्यच होती. प्रशिक्षणाच्या काळात भेटीसाठी आलेल्या पोलीस संचालकांनी प्रशिक्षणार्थींना “तुम्हांला कुठल्या ठिकाणी काम करायला आवडेल?”, असे विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना नारायणराव यांनी असे सांगितले की, “अधिक गुन्हेगारी असलेल्या जिल्ह्यात काम करायला मला आवडेल.” त्यांच्या इच्छेने भारावलेल्या वरिष्ठांनी सांगितले, “फार छान, तुझ्यासाठी ‘कैरा’ योग्य आहे.” नारायणरावांच्या मनासारखेच घडले. कैरा येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रारंभी पाच महिने त्यांनी अहमदाबाद येथेच घालविले. कामाच्या अनुषंगाने त्यांनी तेथील मातृभाषा गुजरातीचाही अभ्यास केला. ‘खून की आत्महत्या?’ असा संभ्रम असलेल्या गुन्ह्याचे प्रकरण त्यांना हाताळावे लागले. ढोलका तालुक्यापासून सुमारे १८ मैलांवर असलेल्या खेडेगावात त्यांना पायपीट करावी लागली. मृत व्यक्तीला त्याच्या पत्नीने खिचडीतून अफूसारखा अमली पदार्थ दिला असावा, असा संशय होता. तथापि हा पदार्थ माहितगारच मिळवू शकत होता. त्यामुळे सदर महिला हे कृत्य करू शकणार नाही, असा निष्कर्ष होता. शवविच्छेदन अहवालात मृताने अफूचे सेवन केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचेच स्पष्ट झाले. गुन्हेगारी कारवायांनी प्रभावित असलेल्या जिल्ह्यात काम करायला आवडेल असे नारायणरावांनी प्रशिक्षण काळात सांगितले होते. त्यानुसार त्यांना कैरा येथे नोव्हेंबर १९२४ मध्ये जावे लागले. जानेवारी १९२७ पर्यंत त्यांना तेथील गुन्हेगारी साम्राज्याशी सामना करावा लागला. खतरनाक दरोडेखोर, खुनी, गुन्हेगारी जमाती यांच्याविरुद्ध लढताना आलेला अनुभव त्यांना पुढील सेवाकाळात उपयुक्त ठरला.

शिल्पकार चरित्रकोश १८९