पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आठ केला आहे. मात्र कारागिरीच्या अंगाने जाणाऱ्या कला, छायाचित्रण, फॅशन डिझाइन, टॅपेस्ट्री किंवा वस्त्रोद्योग अशा कलाक्षेत्रांचा विस्तारभयास्तव समावेश केलेला नाही. अलिकडेच एका वृत्तपत्रात विदर्भातील अमरावती भागातील आदिमानवाची गुफाचित्रे सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ही चित्रे काही हजार वर्षांपूर्वीची आहेत व आपल्याला ती ज्ञात होण्यासाठी एकविसावे शतक उजाडावे लागले. परंतु अवघ्या दोन शतकांपूर्वीच्या दृश्यकलाक्षेत्रातील चित्र-शिल्प परंपरेबाबतही हीच परिस्थिती आहे. विशेषतः इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र याबाबत मागासलेला आहे. या संदर्भातील आवश्यक त्या नोंदी व साधनेच उपलब्ध नाहीत. शिवाय या काळातील कलाकृतींचा एकत्रित असा संग्रहही उत्तम कलापरंपरा असलेल्या मुंबईसारख्या शहरात उपलब्ध नाही. स्वातंत्र्योत्तर काळात व महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला पन्नास वर्षे झाल्यानंतरही यासंदर्भात अत्यंत तुरळक प्रयत्न झाल्याचे दिसते. प्रगतीशील महाराष्ट्र हा दृश्यकलेबाबत अत्यंत समृद्ध अशी कलापरंपरा असूनही बंगाल व दक्षिणेकडील राज्यांपेक्षा अत्यंत मागासलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गाजलेली बॉम्बे स्कूलची कलापरंपरा व त्यातील अनेक श्रेष्ठ कलावंत राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर आजही अज्ञात आहेत. त्याबद्दलची खंत, स्वतः कलावंत व कलाविषयक कार्य करणाऱ्या संस्थांनाच नसेल तर समाजाला कुठून असणार? परिणामी हीच अनास्था येथील समाजधुरीण, उद्योजक व शासक यांच्यातही दिसून येते. आपल्या देशाची आर्थिक राजधानी, उद्योगाचे व कलेचे केंद्र असलेल्या मुंबईत विविध प्रांतातील कलावंत गेली अनेक वर्षे स्थलांतरीत होत आहेत, स्थिरावत आहेत. त्यातून मुंबई शहराचे स्वरूप इतर क्षेत्रांप्रमाणेच याबाबत बहुसांस्कृतिक झाले आहे. परिणामी येथील चित्र-शिल्पकलेत भरपूर वैविध्य आहे. इतर राज्यांमधील कलावंतांना जसे त्यांच्या राज्यांकडून प्रोत्साहन मिळते तसे दुर्दैवाने इथल्या कलावंतांच्या वाट्याला येत नाही ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अशा चरित्रकोशाची निर्मिती करणे म्हणजे मोठे आव्हान होते. चरित्रसाधनांची जमवाजमव करण्यापासून कोशवाङ्मयाची शिस्त पाळून नोंदी लिहिणे हा एक नवा अनुभव होता. म्हणून चित्र-शिल्प व उपयोजित कलेच्या क्षेत्रातील कलावंतांचे सल्लागार मंडळ नेमून या कोशात अंतर्भूत होऊ शकणाऱ्या कलावंतांची नावे निश्चित करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या विविध भागातील कलावंत, अभ्यासक व कला समीक्षकांसोबत मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर व नागपूर या ठिकाणी सप्टेंबर शिल्पकार चरित्रकोश