पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भूमिका 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सहावा खंड वाचकांच्या हाती देत असताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीची ओळख करून देण्यापासून भविष्यकालीन महाराष्ट्राचा वेध घेण्यापर्यंत या प्रकल्पाची व्याप्ती आहे. चित्र-शिल्पकला ही आदिमानवापासून रुजलेली व पुढील काळात विकसित होत गेलेली एक प्रमुख कला आहे. याचे पुरावे आपल्याला आदिमकालिन गुंफा, लेणी, भित्तिचित्रे, उत्खननात सापडलेली मातीची किंवा धातूची भांडी व त्यावरील कलाकुसर, अलंकार, वस्त्र अशा विविध माध्यमांद्वारे दृष्टोत्पत्तीस येते. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ही परंपरा अत्यंत प्राचीन असल्याचे लक्षात येते. महाराष्ट्रातील अजंठा वेरुळ येथील भित्तिचित्रे व शिल्पे, हेमाडपंती मंदिरांच्या घुमटांवरील कलाकुसर, चुनेगच्चीतील शिल्पे (स्टको आर्ट), अशा अनेक कला व कारागिरीच्या आविष्कारासो समारंभासाठी केलेली कलाकुसर, चैत्रगौरीचे पट, जैन व हिंदू मंदिरांमधील पटचित्रे, सचित्र पोथ्या, धातूच्या मूर्ती, भांडी, उपकरणे या साऱ्यांवरच कलेचा प्रभाव दिसतो. घरोघरी दिसणाऱ्या अडकित्त्याला मोराच्या किंवा पोपटाच्या कलाकुसरीसोबतच घुंगरांचा नादही असे. एकूणच कला परंपरा ही घरापासून सामाजिक स्तरापर्यंत व्यापलेली होती. इंग्रजी कालखंडाचा प्रभाव हा जसा महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांवर पडला तसाच तो कलेच्या क्षेत्रावरही पडला. चित्र-शिल्प कलेचा प्रवास वास्तववादी शैलीपासून सुरू होत आजच्या आधुनिक परंपरेपर्यंत येऊन पोहोचला. यात व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, प्रसंगचित्र, रचनाचित्र तसेच व्यक्तिशिल्प, स्मारकशिल्प इत्यादी चित्रशिल्पांच्या कलेतील प्रवास आजच्या आधुनिक मांडणशिल्पापर्यंत येऊन पोहोचला. वाढत्या औद्योगिकरणातून उपयोजित कला विभाग उदयास आला. जाहिरात कला, प्रकाशन कला, संकल्पन, प्रदर्शन आणि दृक्-श्राव्यमाध्यमकला असा आता उपयोजित कलेचा विस्तार झाला आहे. इंटरअॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि इंटरनेट यांच्यामुळे उपयोजित कलेसोबत एकूणच दृश्यकलेचे संदर्भ बदलले आहेत. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीलाच 'महाराष्ट्रीय कोश' यापासून आधुनिक कोशपरंपरा सुरू केली असली तरी चित्रकलेच्या संदर्भात एवढी सर्वंकष माहिती देणारा पहिला कोश तयार होण्यास २०१३ साल उजाडावे लागले. कलाकारांच्या माहितीसोबत त्यांच्या कलाकृतींचाही समावेश या खंडात करण्यात आलेला आहे. ही सर्व माहि तसेच कलाकृतींची छायाचित्रे एकत्रित करण्याचे काम अत्यंत जिकिरीचे, कष्टाचे व चिकाटीचे होते. या खंडाच्या संपादक मंडळाने हे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. 'कलासंचित' या विशेष रंगीत विभागात १७९० सालापासूनच्या १०७ कलाकारांच्या १८८ विविध शैलीतील कलाकृती समाविष्ट केल्या आहेत. हेसुद्धा या खंडाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हा कोश अशा प्रकारच्या कार्यात एक महत्त्वाचा मापदंड म्हणावा लागेल. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्वयंप्रेरणेने किंवा आमच्या विनंतीला मान देऊन विविध विषयांतील तज्ज्ञ, पुरस्कर्ते व ग्राहक यांचे सहकार्य लाभले आहे, लाभत आहे; त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. प्रमुखतः निर्माण ग्रूप ऑफ कंपनीज, दि सारस्वत को-ऑप. बँक, कोकुयो कॅमलिन आणि महिको सीडस् यांनी तसेच 'कलासंचित' या विशेष रंगीत विभागासाठी अन्य प्रायोजकांनी आर्थिक सहकार्य दिले. हा कोश वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. शिल्पकार चरित्रकोश - दिलीप करंबेळकर तीन