पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड उद्यानशास्त्र उद्यानशास्त्रातील घटकांचा मानवी जीवनातील सहभाग केवळ आकडेवारीसारख्या रूक्ष मार्गाने अजमावणे शक्य होणार नाही. मानवाच्या नित्य आहारात येणाऱ्या भाज्या, फळे, तसेच मानवाला ज्यामुळे सौंदर्य, आनंद उपभोगता येतो ती फुले, बागा, हिरवळी, सावलीची व शोभेची झाडे, त्यांच्या लागवडीच्या पद्धती इ. गोष्टींचा समावेश उद्यानशास्त्रात होतो. महाराष्ट्रातील कोकण ते विदर्भातील चांदा भंडाऱ्यापर्यंत आढळणाऱ्या जमिनी व हवामानाच्या विविधतेमुळे आंबा, काजू, मसाल्याची पिके, केळी, संत्री, मोसंबी, नारळ, सुपारी, चिकू, पेरू, पपई, द्राक्षे, डाळिंब, सीताफळ इ. फळपिके; कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी, बीट यांसारख्या फळभाज्या, निरनिराळ्या प्रकारच्या इतर भाज्या, तसेच गुलाब, शेवंती, झेंडू, गुलछडी, कार्नेशन इत्यादी फुलांचा देशांतर्गत व परदेशी बाजारपेठांसाठीच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. तासगावची द्राक्षे, जळगावची केळी, नागपूरची संत्री, सासवडची अंजिरे, सांगोला - सोलापूरची डाळिंब, देवगडचा हापूस, दौंडाईच्या व संकेश्वरी मिरच्या यांची खास वैशिष्ट्ये आहेत. या सर्व पिकांच्या गेल्या शतकातील विस्तार व संशोधन कार्याच्या वाटचालीचा संक्षिप्तरूपात आढावा खाली देण्यात आला आहे. १९०७ मध्ये पुणे येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर भाजीपाला व फुलझाडे यांच्याविषयी विशेष संशोधन व अभ्यासक्रमास सुरुवात झाली. प्रारंभी उद्यानशास्त्र हा विषय कृषी महाविद्यालयातील 'इकॉनॉमिक बॉटनी' या विभागामार्फत शिकवला जात असे. या विभागातील डॉ. बर्न्स व त्यांचे संशोधन साहाय्यक कुलकर्णी यांनी फळझाडातील काही गुणांच्या अनुवंशिकतेचा अभ्यास करून सीताफळ व पेरू यांसारख्या फळझाडांमध्ये बिनबियांचे गुणधर्म आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पी.जी. जोशी, ह.पु. परांजपे, जी. बी. देशमुख यांच्या सहकार्याने या विभागात खाली नमूद केलेल्या पिकांवर संशोधन चालू होते. डाळिंबांच्या बिनबियांच्या / मऊ बियांच्या ढोलका, आळंदी, वडकी; तसेच काबुली मस्कती (ज्या फुलावर लवकर येत नव्हत्या / कमी फुलोरा असायचा) या जाती तौलनिक अभ्यासाकरता लावल्या होत्या. तेथे निरनिराळ्या हंगामांतील छाटणीचे प्रयोगही सुरू होते. शिल्पकार चरित्रकोश अंजिराच्या आळंदी / वडकी या जातींमध्ये उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रयोग चालू होते. नॉचिंग किंवा भेगा /चिरा पाडण्याने सुप्त डोळे फुटण्यास मदत होऊन नव्या फांदया फुटण्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे आढळून आले होते. बगदाद व दक्षिण मेरेडियन येथील जाती चांगल्या वाढतात, पण फळे पक्व होत नाहीत, असे दिसून आले होते. पपईच्या वॉशिंग्टन व इतर अनेक जातींची लागवड केली होती, तसेच शेंडा कापल्याने उत्पादन वाढू शकेल का ? यावर प्रयोग चालू होते. द्राक्षाच्या भोकरी, फकडी, पांढरी साहेबी, काळी साहेबी, नीलम, ब्लॅक प्रिन्स, कंधारी, बसराई यांचा तौलनिक अभ्यास सुरू होता. केवडा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वर्षातून ३ वेळा बोर्डो मिश्रण अथवा ४ वेळा सल्फरची धुरळणी करण्याची शिफारस केली होती. संत्री व मोसंबीच्या या फळपिकांवरील डायबॅक रोगांचा व बहरांचा अभ्यासही केला होता. तसेच उत्पादन तंत्रांचा अभ्यास करून १८-२० फुटांवर झाडे लावली असता ४०० ते १००० फळे येतात. ८० पौंड शेणखत, १.५ पौंड अमोनियम सल्फेट प्रत्येक झाडाला घालण्याची शिफारस केली गेली होती. त्यायोगे अंदाजे प्रत्येक झाडाकडून ६ रु. अधिक उत्पन्न मिळते, असे नमूद केले गेले आहे. केळ्यांमध्ये राजापुरी जात उत्पन्नाला चांगली असल्याचे आढळून आले होते. आंब्यावरील डोळा भरण्याच्या प्रयोगात अंशत: यश मिळाले होते व मे महिन्यात भरलेल्या डोळ्यांत ५०% यश मिळाले होते. टॉप वर्किंगचे प्रयोगही आंबा पिकात १९१२-१६ या काळात करून वसई, बलसाड व ठाणे बेलापूर पट्ट्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे राबवला होता. चिकू व बोर पिकांतही हे तंत्र यशस्वीरीत्या वापरले गेले होते. त्याचप्रमाणे टोमटो, मिरची या पिकांवरही प्रयोग चालू होते. त्यात बाहेरील जातीतून रुळलेले वाण निवडण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यापैकी टोमॅटोमधील बॉनीबेस्ट ही जात प्रसारित केली होती. गणेशखिंड येथे पेरूच्या धारवाड, नाशिक, लखनौ २४ व अलाहाबाद सफेदा या जाती प्रसारित केलेल्या होत्या. अंजिराच्या गॅसियन, इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच या जातींवरही अभ्यास सुरू होता. मोसंबीवर निरनिराळ्या १२ जातींच्या मातृवृक्षावर डोळे भरण्याचे प्रयोग सुरू होते. त्यात ११३