पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड उत्पादकता ( ६६ टन/हे.) साखर उतारा (१०.१९%) व साखर उत्पादन १८९.१२ लाख टन एवढे कमी झाले. यामुळे साखर आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली. भारतात दर चार ते पाच वर्षांनी, साखर उत्पादनात होणारे चढ-उतार आणि ऊस उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये चांगली वाढ होण्याची क्षमता असताना सध्या आलेली स्थिरता आणि वाढता उत्पादन खर्च हे ऊस शेती व साखर उद्योगापुढील प्रमुख आव्हान आहे. हे आव्हान व या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन साखर उद्योगावरील निर्बंध हटवण्याबाबत व साखर उत्पादनात होणारे चढ-उताराचे चक्र थांबवून ऊस व साखर उत्पादनात सातत्य ठेवण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी २७ जानेवारी २०१२ रोजी भारत सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. महाराष्ट्रातील ऊस शेती संदर्भात सध्याच्या ऊस उत्पादन खर्चात बचत करून ऊस उत्पादकता व गुणवत्ता वाढवणे हे प्रमुख आव्हान आहे. ऊस संशोधनाचा ऊस शेती व साखर उद्योगावर परिणामः महाराष्ट्रात ऊस शेती व साखर उद्योगास ऊस संशोधनाचे (१८९२ पासून) फार चांगले पाठबळ आहे. ऊस संशोधन केंद्र मांजरी, पाडेगाव, कोल्हापूर, व्ही. एस. आय. पुणे या संस्था संशोधनाच्या कामात कार्यरत असून संशोधनाचे निष्कर्ष व शिफारशी वेळोवेळी प्रसारित करतात. प्रयोगशील व प्रयत्नशील असणारे शेतकरी या शिफारशी जाणून व त्यांची अंमलबजावणी करून हेक्टरी २०० ते २५० टनांपर्यंत उत्पन्न घेतात; परंतु बहुसंख्येने असणारा सर्वसाधारण शेतकरी, साधनसामग्रीचा अभाव, निविष्ठांच्या वाढत्या किमती व त्या वेळेवर न मिळणे, आर्थिक अडचणी इत्यादींमुळे आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करू शकत नसल्याने ऊस उत्पादकता वाढत नाही. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे व्यवस्थापन ऊस शेती व ऊस विकासाबाबत उदासीन असून कारखान्यात ऊस विकास विभाग दुर्लक्षित आहे. काही कारखाने मात्र ऊस विकासाच्या कामास प्राधान्य देत असून ऊस उत्पादकता व गुणवत्ता वाढवून प्रगती करत आहेत. ऊस जातीच्या शिफारशीबाबत बहुसंख्य शेतकरी जागरूक असून त्याची अंमलबजावणीही करतात. यामुळे महाराष्ट्राच्या सरासरी साखर उताऱ्यात ०.६० युनिट अशी भरीव वाढ झाली आहे. भविष्यातील ऊस संशोधन व विकास : शाश्वत ऊस शेती : महाराष्ट्रातील ऊस शेती किफायतशीर होण्यासाठी व शिल्पकार चरित्रकोश साखर उद्योगाच्या स्थैर्यासाठी शाश्वत ऊस शेती आवश्यक आहे. शाश्वत ऊस शेतीत, ऊस उत्पादकता व गुणवत्ता वाढवत असताना अपेक्षित पातळीवर स्थिर ठेवून (उत्पादकता १२५ ते १५० टन/हे. व उतारा १२ ते १२.५०%), जमिनीच्या सुपीकतेवर व पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. भविष्यातील ऊस संशोधनाचे महत्त्वाचे घटक : ऊस जातीनिर्मिती : तापमान वाढ व बदलत्या हवामानात टिकणाऱ्या, चांगली उत्पादकता व गुणवत्ता, पाण्याचा सहन करणाऱ्या, खोडव्याचे उत्पन्न समाधानकारक व खोड किडीस बळी न पडणाऱ्या अशा गुणधर्माच्या ऊस जाती निर्माण कराव्या लागतील. अशा वाणांची पैदास व उपलब्धता, संकरित पद्धत व जनुकीय तंत्रज्ञान पद्धतीमुळे थोड्या कालावधीत होऊ शकते. ऊस उत्पादकता वाढ : जमिनीची सुपीकता टिकवणे, पाण्याचा मोजका व नेमका वापर तंत्रज्ञान, ठिबक- तुषारसिंचन, जमिनीअंतर्गत (सबसरफेस) ठिबक, रासायनिक खतांचा कमीत कमी व जैविकांचा जास्तीत जास्त वापर, यांत्रिकीकरण, शुद्ध व चांगले बियाणे व खोडवा उत्पादन तंत्रज्ञान याबाबत विशेष व अधिक संशोधन करावे लागेल. यामुळे उत्पादन खर्चात बचत व शाश्वत उत्पादकता साध्य करता येईल. पीक संरक्षण : कीड व रोगनियंत्रणाबाबत बेणे प्रक्रिया, मशागत तंत्रज्ञान, जैविक नियंत्रण व रासायनिक औषधांचा कमी वापर याबाबतच्या संशोधनास प्राधान्य द्यावे लागेल. ऊस विकास : साखर कारखान्यातील ऊस विकास विभागाचे बळकटीकरण व सक्षमीकरण, उत्पादकता वाढीचे गाव पातळीवर नियोजन व कृती आराखडा करून त्याच्या अंमलबजावणीसाठी निविष्ठांचा योग्य वेळी पुरवठा आवश्यक आहे. कारखाना व्यवस्थापनाने व्यावसायिक दृष्टिकोन पारदर्शक व्यवस्थापनाचा अवलंब करून ऊस पिकास किफायतशीर भाव देणे आवश्यक आहे. यामुळे ऊस शेती व साखर उद्योगास स्थैर्य प्राप्त होईल. महाराष्ट्रातील जमीन, पाणी व हवामान ऊस उत्पादकता वाढवण्यास अनुकूल असताना १९८२-१९८३ पासून ऊस उत्पादकता कमी झालेली आहे. हे साखर उद्योगाचे व कारखाना व्यवस्थापनाचे अपयश आहे. ७३