पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड प्रमाणावर धूप होते, त्यामुळे या क्षेत्राचा उपयोग जनावरांचे पाय मोकळे करणे याशिवाय फारसा होत नाही. सर्वसाधारणपणे एका जनावरास त्याच्या पालनपोषणासाठी एक हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. राज्यातील उपलब्ध पशुधनाच्या तुलनेने हे क्षेत्र फारच कमी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रातून एक ते दीड महिना पुरेल एवढ्या चाऱ्याचेच उत्पादन होते. मात्र व्यवस्थापनात सुधारणा करून वनीय पद्धतीचा वापर केल्यास उपलब्ध क्षेत्रातून पाच ते सहा महिने पुरेल इतके चाऱ्याचे उत्पादन करणे सहज शक्य आहे असे दिसते. चारावैरण उत्पादन करणाऱ्या साधनांचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, गायराने व कुरणापासून मिळणाऱ्या चाऱ्याचा पशुधनास अत्यल्प उपयोग होतो. प्रामुख्याने कडबा, सरमाड, भातपेंढा पिकांचे अवशेष यांसारख्या निकृष्ट व अल्प पोषणमूल्ये असलेल्या गोष्टींवर पशुधनास उदरनिर्वाह करावा लागतो. चारा उत्पादनातील समस्या : वैरण उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्यात पुष्कळ समस्या आहेत. त्यापैकी पशुसंख्येच्या व्यस्त प्रमाणातील भौगोलिक क्षेत्र, अयोग्य गायराने व्यवस्थापन, लोकसंख्या आणि पशुसंख्येतील प्रचंड वाढीमुळे अन्न व चारा मिळवण्यातील चढाओढ, शिवारातील विखुरलेले क्षेत्र व निकृष्ट जमिनीचा चारा उत्पादनासाठी वापर इत्यादी ठळक बाबी आहेत. गायरान लागवड व व्यवस्थापन : गायरानाच्या विकासात जमीन हा महत्त्वाचा घटक आहे. जमीन सेंद्रिय पदार्थयुक्त व पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली असावी. जमीन किमान उथळ (२२.५ सें. मी.) असावी, पण पाणथळ आम्ल व अल्कधर्मी नसावी. जमिनीची नांगरट करून जमीन पेरणीयोग्य करावी. उताराची जमीन असल्यास धूप होऊ नये म्हणून मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. शेणखत / कंपोस्ट १० ते १२ गाड्या पूर्वमशागतीच्या वेळी मिसळावे. गायराने विकसित करताना पहिल्या वर्षी रासायनिक खतांचा वापर टाळावा. दुसऱ्या वर्षानंतर दर हेक्टरी ४० कि. नत्र, २० कि. स्फुरद व २० कि. पलाश दोन हप्त्यांत द्यावे. सुरुवातीच्या काळात तणांचा गवताच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्याकरता कोळपणी, खुरपणी आदी कामे करावीत. गवताच्या समाधानकारक वाढीसाठी ओलाव्याचे संधारण करावे. अवर्षणग्रस्त भागात ठरावीक अंतरावर सऱ्या काढल्यास भूजल संधारण होऊन गवताची चांगली वाढ होते. महाराष्ट्रात गायरान योग्य अधिक उत्पादन देणाऱ्या द्विदल गवताची कमतरता असल्याने स्टायलोझॅथस हॅमाटाची अवर्षणप्रवण व हमखास पावसाळी प्रदेशात स्वतंत्र पीक म्हणून लागवड करावी. पहिल्या वर्षी गायरानातून उत्पादन कमी मिळते व या वर्षी बी झडून गेल्यावर कापणी करावी. गायरान व्यवस्थापन ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्यामुळे निष्कर्ष ३-४ वर्षांनंतर दिसतात. दुसऱ्या वर्षानंतर तयार केलेल्या आराखड्यानुसार चराई अथवा कापणी करावी. सर्वसाधारणपणे गवतावर आधारित गायरानाचे उत्पादन पाचव्या किंवा सहाव्या वर्षी कमी होते, तर द्विदल गवत आधारित गायरानात दहा ते बारा वर्षांनी उत्पादनात कमतरता येते. गायरानांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करण्याची व्यवस्था करावी. गायरानात उत्कृष्ट गुणवत्तेचा चारा उत्पादन करणे हे महत्त्वाचे काम आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी योग्य नियोजन, शास्त्रीय ज्ञान, व्यवस्थापन कौशल्य व देखभाल यास पर्याय नाही. थोडक्यात गायरानातील यश जमिनीची निवड, मशागत, सुधारित वाणांचा वापर, पेरणी, कापणी / चराई यावर अवलंबून असल्यामुळे या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास निश्चितच फायदा होईल. पशुधनाच्या वाढत्या वैरणविषयक गरजा भागवण्यासाठी - पिकांचे अवशेष, जंगलातून उत्पादित चारा वैरण, बांधावरील गवत, उसाचे वाढे, समस्यायुक्त (पाणथळ, चोपण) जमिनीतून चारा उत्पादन, पिकांतील तणे, फळे, भाजीपाला प्रक्रियेत उपलब्ध होणारे उपपदार्थ, पडीक जमिनीचा विकास, आंतर व मिश्रपिकांतून चारा उत्पादन इत्यादी बाबींचा एकात्मिक पद्धतीने उपयोग केल्यास चारा उत्पादनात स्वयंपूर्णता आणणे सहज शक्य आहे. - डॉ. द.र. बापट, डॉ. मुकुंद भागवत

शिल्पकार चरित्रकोश ६३