पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्य खंड
केळकर, नरसिंह चिंतामण
 

कादंबऱ्या आणि 'अंधारवड', 'दिवाण झिप्री' व 'प्रमिला' या तीन अपूर्ण कादंबऱ्या केळकरांनी लिहिल्या आहेत. 'माझी आगगाडी कशी चुकली', 'कपड्यांची अदलाबदल', 'दुधाची धार अथवा गुप्तदान', 'अलिगड किल्ल्यातील एक रहस्य' या कथा आणि तथाकथित कथात्मक लेखन त्यांनी केले आहे. परंतु कथात्म साहित्याविषयीची त्यांची समजूत प्राथमिक स्वरूपाची होती. 'आयर्लंडचा इतिहास' (१९१०), 'मराठे व इंग्रज' (१९१८), 'फ्रेंच राज्यक्रांती' (१९३५) हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ विविध ऐतिहासिक साधनांचा उचित उपयोग करून सिद्ध केलेले आहेत. 'भारतीय तत्त्वज्ञान' (१९३४) हे त्यांचे पुस्तक तत्त्वज्ञानपर संग्रहग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.
 'राज्यशास्त्र' (१९३२), 'तिरंगी नवमतवादी' (१९३७), 'संस्थानी राजकारण' (१९२९), 'हिंदी स्वराज्याची कैफियत' (१९१९), 'केस फॉर इंडियन होमरूल' (१९१७) हे त्यांचे राजकारणविषयक लेखन प्रौढ व अनुभवी पत्रकारास साजेसे आहे. 'गॅरीबाल्डीचे चरित्र' (१९०१), 'त्रिखंडात्मक लोकमान्य टिळक चरित्र' (१९२३, १९२८), 'फ्रान्सची झाशीवाली' (१९४०) या नावाने लिहिलेले जोन ऑफ आर्कचे चरित्र, आयर्लंडचा इतिहास या ग्रंथाच्या शेवटी लिहिलेली आठ आयरिश देशभक्तांची छोटी चरित्रे हे केळकरांचे चरित्रलेखन होय. टिळकचरित्र २००० पृष्ठांचे आहे. परंतु त्याला एकसंधपणा नाही. तसेच त्यात नियोजन व मांडणी यांचा अभावही आढळतो. 'मी लिहिले ते मुख्यतः घडलेला इतिहास संगतवार सांगण्याच्या दृष्टीनेच लिहिले आहे' ही या चरित्रलेखनामागची केळकरांची भूमिका होती.
 बडोदा येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे केळकर अध्यक्ष होते. या प्रसंगी त्यांनी 'खरी सविकल्प समाधी उत्पन्न करू शकते ते वाङ्मय' अशी भूमिका मांडली. ही उपपत्ती मराठी साहित्यविचारात दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरली. 'प्रत्येक पिढीची अभिरुची व स्मरणशक्ती या दोन चाळण्याच होत. या जोडचाळणीतून प्रत्येक पिढीत काही लेख सरस्वतीच्या गंगाजळीत पडतात व हे सर्व गाळीव लेख मिळून जो संग्रह होतो त्याचेच नाव वाड्मय' हा त्यांचा वाङ्मयविचार अभिजात वाङ्मयाच्या चर्चेकडे वळतो. 'कलाविलासाच्या मागे हेतुसंशोधनाचा गुप्त पोलीस लावून दिला तर अनर्थकारक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत' असाही निःसंदिग्ध इशारा याच भाषणात केळकरांनी दिला. तो केळकरांची कलावादी भूमिका सुचवितो. 'सुभाषित आणि विनोद' (१९११) व 'हास्यविनोदमीमांसा' (१९३७) ही हास्यकारण व विनोदस्वरूप यांची चर्चा करणारी पुस्तके केळकरांनी लिहिली आहेत.
 'विलायतेच्या प्रवासाचे वर्णन' (१९१९), 'सिमला येथील छोटी हजेरी' (१९२४), 'माझा सरहद्दीकडील दौरा' (१९२९), 'पूर्व बंगालची सफर' (१९२९), 'माझी म्हैसूरकडील प्रवासयात्रा' (१९३७) ही केळकरलिखित प्रवासवर्णने व स्थलवर्णने वाचनीय आहेत. केळकरांनी अनेक ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावनांपैकी सदाशिवराव बापट यांनी संपादिलेल्या 'लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका' या संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना चरित्राच्या संदर्भात आठवणी आणि आख्यायिका यांना कोणते स्थान असते, याची मार्मिक चर्चा करणारी आहे. अतिशय समाधानी व प्रसन्न वृत्तीच्या या साहित्यसम्राटाचे निधन १४ ऑक्टोबर १९४७ रोजी पहाटे झाले. दि. १३ रोजी त्यांच्या टेबलावर उघडे फाउंटन पेन व चष्मा होता आणि त्याखाली 'दिसों लागे मृत्यू परि न भिववूं तो मज शके / तयाच्या भेटीचें असत मजला ज्ञानचि निकें... ' या ओळींनी सुरू होणारी त्यांची कविता होती.

- डॉ. विलास खोले

संदर्भ:

  1. केळकर जन्मशताब्दी महोत्सव ग्रंथ'; केसरी प्रकाशन, पुणे; १९७२.
  2. कुलकर्णी वा. ल.; 'न. चिं. केळकर वाङ्मयदर्शन'; पॉप्युलर प्रकाशन, मुंबई; १९७३.
शिल्पकार चरित्रकोश
१२५