पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धर्मबुद्धी शिकवत असतो. ती आपण अंगिकारली तर भारतीय समाजातील जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश, लिंग इत्यादींवर आधारित भेद व विषमता नष्ट होऊन भारत एकसंध व एकात्म देश होईल. एकविसाव्या शतकातील महात्मा गांधींच्या विचारांची प्रस्तुतता समजावणारा हा लेख म्हणजे साहित्य आणि विचारांचं अद्वैत अधोरेखित करणारा आचारधर्म म्हणून पाहता येईल. ‘शब्द सोन्याचा पिंपळ' तेव्हाच होईल, जेव्हा भाषा आणि साहित्य हे माणूस घडणीची विधायक साधनं बनतील.
 सुधारित आवृत्तीतील नव्या आठ लेखात विषय वैविध्य व समकालीनता आहे. त्याचा परिचय एका लेखात आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात इंटरनेटच्या माध्यमातून मराठी समृद्ध होत आहे. तिची ओळख करून देण्यात आली आहे. आज माध्यम व मौखिक मराठीवर इंग्रजीचे आक्रमण वाढत आहे. ती इंग्रजीच्या गर्तेत घुसमटत आहे. मराठीत वापर मराठी भाषेस केवळ प्रदूषित करत नसून तो मराठीचा -हास करतो आहे. याबद्दल जागृतीच्या दृष्टीने लिहिलेला लेख वाचकांना अंतर्मुख करेल. भाषा कौशल्याची क्षेत्र नव्या काळात वाढली असून मराठी विकास व वापराची नवी क्षेत्रे व संधी विकसित झाल्याचे भान वाचकांस नवीन लेखांमधून होईल. वाचन व्यवहारांच्या बदलत्या व्यवहार व साधनांचे भान नवे लेख देतील. नवी पिढी वाचत नसल्याने साहित्यिकांची, शिक्षकांची तब्दतच पालकांचीही जबाबदारी वाढत आहे, याचे भान हे पुस्तक देईल असा मला विश्वास वाटतो.

  

दि. ११ जुलै, २०१७
- डॉ. सुनीलकुमार लवटे