पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
 

 मात्र, कामाची सोपवणूक ही केवळ वेळेच्या व्यवस्थापनापुरतीच उपयुक्त असते असे नव्हे. लोकांत विकास घडवून आणण्याची ही एक सर्वात महत्त्वाची पद्धत आहे. एखाद्या व्यवस्थापकाला एखाद्या सखोल तीव्रतम स्वरूपाच्या व्यवस्थापन विकासाचा अभ्यास करण्यासाठी पाठविणे आणि तो परत आल्यावर त्याला पूर्वीचेच काम करायला सांगणे यात काही अर्थ नाही. विकासाशिवाय होणारी ही प्रशिक्षण पद्धत आहे. कामाच्या सोपवणुकीद्वारे जर हाताखालच्या व्यक्तीला अधिकाधिक जबाबदारी दिली तर कमीतकमी प्रशिक्षणाने तो स्वत:चा विकास स्वतः करू शकेल.
 आपल्या हाताखालील व्यक्तींचा फारसा विकास झालेला नाही या वस्तुस्थितीविषयी बहुतेक व्यवस्थापकांना बिलकूल पर्वा नसते. भारतातील परिस्थिती अशी आहे की एखादा नमुनेदार व्यवस्थापक त्याच्या भावाला, पुतण्याला मदत करायला पुढे सरसावेल, पण स्वत:च्या हाताखालील व्यक्तीच्या विकासासाठी काहीएक करणार नाही. साधी मदतही करणार नाही. संघटनेशी असलेल्या संबंधांपेक्षा कुटुंबाशी असलेले संबंध अधिक निष्ठा मिळविण्यात समर्थ ठरतात. जिथवर हाताखालच्या व्यक्तीचा प्रश्न असतो, व्यवस्थापक असा दैववादी दृष्टिकोन ठेवायला तयार असतो, की 'हाताखालची व्यक्ती त्याच्या दैवात असेल तर येईल वर...' फारतर तो व्यवस्थापक हाताखालच्या व्यक्तीचे प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नाव नोंदवील. पण प्रत्यक्ष काम करीत असताना कामाच्या सुधारणेबाबत आणि वाढीव जबाबदारीबाबत पाठिंबा मिळाल्याशिवाय हे प्रशिक्षण कार्यक्रम परिणामशून्य ठरतात.
 यातून आपण कामाच्या सोपवणुकीच्या मुख्य प्रेरणेकडे येतो, ती म्हणजे व्यवस्थापनाचे व्यावसायिकीकरण. आपण व्यावसायिक व्यवस्थापकांविषयी बोलतो. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, जोवर व्यवस्थापक मंडळी कामाची सोपवणूक करायला आणि त्यांच्या हाताखालील व्यक्तींचा विकास करायला इच्छित नाहीत तोवर व्यावसायिकता असू शकत नाही. व्यावसायिकतेचं खरं बोधवाक्य आहे ते म्हणजे, ‘शिष्यात् इच्छेत् पराजयम्' (तुमच्या शिष्याकडून पराजित होण्याची इच्छा बाळगा.) जोवर तुमचा शिष्य तुमच्याहून श्रेष्ठ होत नाही आणि तुमच्याहून उत्तम कामगिरी करीत नाही तोवर तुम्ही व्यावसायिकतेला तुमचे योगदान दिलेले नाही आणि हेच तर कामाच्या सोपवणुकीत साध्य होते. जर व्यवस्थापक व्यावसायिकतेत विश्वास ठेवीत नसेल आणि त्या दिशेने प्रयत्न करीत नसेल तर व्यावसायिक व्यवस्थापनाची स्थापना होणार नाही.
 आयर्वेदिक औषध आणि अ‍ॅलोपथिक औषधे यांच्या इतिहासांची तुलना करून व्यावसायिक कार्यधोरणाने काय फरक पडू शकतो ते आपण पाहू शकतो. आयुर्वेद हा अ‍ॅलोपथीपेक्षा दहापटीने जुना आहे. पण आज भारतातसुद्धा लोकांचा आयुर्वेदावरील