‘काळजी' हा एक शब्द. काम करताना दिसतो - दिलेले आदेश कायदेशीरपणे न पाळल्याबद्दलचे आरोपपत्र न देताही.
मागे एकदा मी पूर्वसूचना न देता एक महत्त्वाची पार्टी दिली. अचानक एक मित्र जायला निघाला.
“का?" प्रत्येकाने विचारलं.
“आठ वाजलेत," तो म्हणाला.
"यावेळी रोजच आठ वाजतात. आज कसली घाई?" मी विचारलं.
"माझी बायको एकटी आहे." तो म्हणाला.
“जोवर ती एकटी आहे तोवर कसली चिंता?" मी विचारलं.
"मी घरी पोहोचल्याखेरीज ती काही खाणार नाही." तो म्हणाला.
"तिच्याकडे तिचं स्वयंपाकघर आहे. ती खाईल काहीतरी." मी मुद्दा मांडला.
"नाही." तो म्हणाला, “ती काळजी करीत राहील."
मी म्हणालो, “मग तू जा."
नाहीतर बायकोच्या चिंतेची चिंता करीत त्याने पार्टीची मजा बिघडविली असती.
मला एक जुनी गोष्ट आठवते. गोष्ट लिहिली आहे मुन्शी प्रेमचंदने. या गोष्टीचे नाव आहे ‘बडे भाईसाहब'. ही गोष्ट दोन भावांची आहे. एक मोठा भाऊ आणि दुसरा धाकटा. मोठा भाऊ गंभीर, अभ्यासू वृत्तीचा आहे. धाकटा भाऊ निर्धास्त, आनंदी, खेळकर स्वभावाचा. त्याला पतंग उडवायला आवडतं. प्रत्येक वेळी जेव्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला पतंग उडविताना पाहतो तेव्हा त्याला ओढून घरी आणून म्हणतो, "बेड लागलंय तुला? परीक्षा जवळ आली आहे ते कळत नाही तुला? अभ्यासाला बस, खूप अभ्यास कर, चांगले गुण मिळव, परीक्षा पास हो आणि आयुष्यात यशस्वी हो!" तो धाकटा भाऊ बिचारा अभ्यासाला बसतो. धाकटा भाऊ पास होतो. मोठा भाऊ नापास होतो! पुन्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला पतंग उडविताना पकडतो. तो म्हणतो, “तु पास झालास यावर जाऊ नकोस. खालच्या वर्गाच्या परीक्षा सोप्या असतात. तू जसजसा वरच्या वर्गात जाशील तसतशा परीक्षा कठीण होत जातील. अभ्यासाला बस, खूप अभ्यास कर, चांगले गुण मिळव, परीक्षा पास हो आणि आयुष्यात यशस्वी हो!" पुन्हा तो धाकटा भाऊ पास होतो आणि मोठा भाऊ नापास. आती दोघे एकाच वर्गात येतात. पुन्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला पतंग उडविताना पकडतो. तो म्हणतो, “वेड लागलंय की काय तुला? मी किती मन लावून मेहनतीने अभ्यास करतो हे दिसत नाही तुला? तरीसुद्धा मी ही परीक्षा पास होऊ शकत नाही. तू पास झालेल्या परीक्षा मी पण पास झालोय. ही खरी अवघड परीक्षा आहे.