पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०४
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
 

केल्यापासून पंचेचाळिसाव्या वर्षापर्यंत त्याला चार-पाच वेळा बढत्या मिळालेल्या असतात आणि तो खूष असतो. पण जेव्हा तो पुढे पाहतो तेव्हा त्याला आढळतं की तो निवृत्त होईपर्यंत त्याला बढती नाही किंवा जेमतेम एखादीच बढती मिळेल. या कारकिर्दीविषयीच्या दडपणाबरोबरच त्याला घरीही दडपण येऊ लागते. या काळात मुले पालकांवर तणाव, वैफल्य, नैराश्य आणू लागतात. ही सर्व दडपणे एकत्र येतात आणि त्यामुळे हा काळ कार्यकारी अधिका-याच्या जीवनातील कठीण काळ होतो.

 कार्यकारी अधिका-याची ‘मासिक पाळी' बंद होण्याच्या काळाच्या या दडपणाला कमी करण्यासाठी त्या कार्यकारी अधिका-याने ‘जीवनात पर्यायी केंद्र' विकसित करायचा विचार करायला हवा. जर एखाद्या व्यक्तीचा आनंद जर फक्त त्याची नोकरी आणि त्याचे कुटुंब यातून मिळत असेल तर, या दोन्हींतून जर वैफल्य आले तर ते अत्यंत क्लेषकारक, विपत्तीजनक ठरते. मात्र, जर ती व्यक्ती सोशल क्लब, व्यावसायिक संघटना, इत्यादींमध्ये सहभागी होत असेल तर एका भागातील वैफल्याची दुस-या भागातील यशाने भरपाई होऊ शकते. जर कुणी एखादा त्याच्या कंपनीचा अध्यक्ष होऊ शकत नसेल तर तो निदान रोटरी क्लबचा तर अध्यक्ष होऊ शकतो - ते खूप सोपे असते. स्वत:च्या संघटनेत उच्चपदावर न जाण्यातील वैफल्याची या यशाने काही अंशांनी तरी भरपाई होते.

 विशेष दडपणाचा दुसरा वैयक्तिक स्रोत म्हणजे अपेक्षित असलेली निवृत्ती. निवृत्त व्हायचे वय जसजसे जवळ येते, आणि ज्या मंडळींनी निवृत्तीनंतर काय करायचे याचा विचार केलेला नसतो ते खूप मोठ्या दडपणाच्या समस्यांमध्ये सापडतात. जर निवृत्तीनंतर काय करायचे याची योजना नसेल तर हे दडपण निवृत्तीनंतरही येत राहते. याच्याशी सामना करायचा खरा मार्ग म्हणजे निवृत्तीविषयीची योजना आखणे. यात तुम्ही केवळ आर्थिक बाबींचेच नव्हे तर मानसिक बाबींचे आणि वेळेच्या रचनेच नियोजन करता. सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायला हवा ते म्हणजे छंद विकसित करणे - ज्यातून तुम्हांला निर्मिती, सर्जनशीलतेच्या भावनेने गुंतवून ठेवल जाते. अपेक्षित निवृत्तीने येणा-या दडपणाशी सामना करू शकण्याचा हा एकमेव माग असेल.


निष्कर्ष

 • दडपण हा व्यवस्थापकाच्या जीवनाचा एक भाग आहे हे स्वीकारणे.

 • दडपणाने उत्पादकता सुधारू शकते हे जाणणे.

 • दडपणाशी समजूतदारपणे सामना करणे.