पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक व सामाजिक

तिला ती हाक पोचली. आणि त्या एकदम शांत झाल्या, रडू लागल्या. तिच्याभोवती गोळा होऊन तिच्या पाया पडू लागल्या.
 बाहेर येताच एलिझावेथने तुरुंगसुधारणेसाठी एक समिती स्थापन केली व कार्याला आरंभ केला. तिच्या सहकारी स्त्रियांनी लोकात जागृति केली, सरकारी अधिकाऱ्यांना वश केले, पार्लमेंटमध्ये ठराव आणले आणि शेवटी दीर्घ प्रयत्नाने शेकडो, हजारो, लक्षावधि हतभागी जीवांना मानवत्वाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. १७ व्या वर्षी अमेरिकेतील विल्यम साव्हेरी नावाच्या एका धर्मगुरूच्या प्रवचनाने तिला स्फूर्ति प्राप्त झाली. आणि तेव्हापासून तिने तरुणपणाची छानछोकी सर्व टाकून दिली. विसाव्या वर्षी तिचे लग्न झाले आणि त्यानंतर ७-८ मुलांचा प्रपंच संभाळून तिने आपला देह या सर्वस्वी हीन, दीन, पतित स्त्रियांसाठी चंदनासारखा झिजविला. त्या अनाथ अपंगांना तिने हृदयाशी धरले आणि इतक्या हीन स्थितीला मानव पोचू नये अशी कायमची व्यवस्था केली.
 ही शेवटची गोष्ट फार महत्त्वाची आहे. धर्मवचनांना हा सामाजिक अर्थ आपल्याकडे निर्माणच झाला नाही. एलिझाबेथच्या चित्ताला या आर्तांच्या दु:खाची जाणीव होताच तिने लगेच आपल्या निकटच्या दहाबारा स्त्रियांची एक समिति स्थापन केली, सर्व समाज हलवून सोडला, लोकसभेपर्यंत गाऱ्हाणे पोचविले आणि धर्मकार्यासाठी सामाजिक शक्ती निर्माण करून तिने लक्षावधी भ्रष्ट, पतित मानवांच्या जीवनांना आलेली अवकळा नष्ट केली. ते लक्षावधि मानव एकदा तुरुंगात गेल्यावर कायमचे पतित, हीन, धर्मशून्य राहिले असते. ही घोर आपत्ती तिने नाहीशी केली. आणि त्यांना धर्ममार्गावर आणून सोडले. भारतवर्षाच्या गेल्या हजारबाराशे वर्षांच्या इतिहासात या दृष्टीने एकही प्रयत्न झालेली दिसत नाही. संत उपदेश करीत होते. आणि लोक धर्मही करीत होते. पण ते धर्माचरण पुण्यासाठी होते, स्वतःच्या परलोकप्राप्तीसाठी, मोक्षासाठी होते. हतभागी मानवांचे जीवन पुढे कायमचे सुखी व्हावे आणि ज्या समाजव्यवस्थेमुळे लक्षावधी लोक मानवत्वापासून भ्रष्ट होतात, पतित होतात, म्हणजेच धर्मशून्य होतात ती व्यवस्थाच बदलून टाकावी यासाठी कसलेही प्रयत्न येथल्या नागरिकांनी केले नाहीत. वैयक्तिक धर्माचरण येथे होत असे ते पुण्यप्राप्तीसाठी होत असे. ज्या अनाथांना, अपंगांना आपण आज अन्न देत