पान:वेरुळ.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४७

७. शैव लेणी.


 तेरा नंबरापासून ते तीस नंबरच्या लेण्यापर्यंत सतरा लेणी शव अथवा यूरोपीय पंडितांनी नामकरण केल्याप्रमाणे ब्राह्मणी लेणी आहेत.

 बुद्ध लेणी आधी कोरली गेली हें वर लिहिलेंच आहे. आणि बुद्धधर्माचे वर्चस्व कमी होऊन आर्य धर्माचा पगडा बसण्यास आरंभ झाल्याबरोबर शैवांनी ही शैव लेणी कोरण्यास आरंभ केल्या कारणानें, पहिल्या पहिल्या गुहांमध्ये तरी त्यांनी बुद्ध शिल्पी- यांच्या कारागिरीचें अनुकरण केलें आहे, यांत कांही शंका नाही.

 मात्र या शैव लेण्यांमध्ये विहार कोठेंही नाहीत. कारण शिवमंदिरांत वास करूं नये असे असल्या कारणानें या लेण्यांमध्ये रहावयासाठी खोल्या अशा कोठेंही कोरल्या नाहीत. मोठमोठे दिवाणखाने, दोन दोन तीन तीन मजली इमारती, भव्य आणि विलक्षण आणि अत्यंत सुबक असें नकसकाम केलेले अनेक खांब आणि सर्व भिंतीवरून अनेक चित्रे, असली अमोल कलाकुसरीची भव्य कामें सर्व शैव लेण्यांमध्ये आहेत.

 बुद्धधर्मीय लेण्यांमध्ये बुद्धाच्या अवतारांतील कांही गोष्टी व बुद्धाच्या मागील जन्मांतील कित्येक जातक कथा, एवढाच भाग कोरावयाची सवड होती. पण शैव अथवा आर्यधर्म झटला की रामायण, महाभारत, इत्यादि ऐतिहासिक मानलेले ग्रंथ, स्कंदपुराण, देवीभागवत इत्यादि अठरा पुराणें आणि उपपुराणे यांतील कथा चित्रित करण्यास अवसर सांपडल्या कारणानें, या शैव लेण्यांतील प्रत्येक भिंत, कोनाडा, कोपरा अथवा स्तंभ हीं कांहींना कांही कथा आजही सांगत आहेत.

 बुद्ध धर्मीय लेण्यांत ज्याप्रमाणे गर्भागारामध्ये मुख्यासनावर गौतम बुद्धाची मूर्ति कोरलेली आहे, त्याप्रमाणे या सर्व शैव लेण्यांमध्ये गर्भागारांत शिवलिंग कोरलेले आहे.

 यांमध्येही एक विशेष आहे. तो असा की, या शिवलिंगांच्या शाळुंका चौकोनी आहेत. आज आसेतुहिमाचल ज्या ज्या ठिकाणी शिवालयें आहेत, त्यांतील सर्व शाळुंका वाटोळ्या असून त्यांस एका बाजूस परिनालिका असते. पण वेरूळ येथील लेण्यांत चौकोनी शाळुंकेसच लहानशी परिनालिका आहे. कदाचित पंधराशे वर्षांपूर्वी शाळुंका चौकोनी करण्याचा सांप्रदाय होता. आणि आज ज्या ज्या ठिकाणी वाटोळ्या शाळुंका आहेत ती ती शिवालयें पंधराशे वर्षां अलीकडील असावीत असा यापासून अर्थ निष्पन्न होईल.