पान:वेरुळ.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४

 पण हे सर्व ' रात्र थोडी आणि सोंगें फार' असे झाले. कोठेंही शांतपणानें सूक्ष्म निरीक्षण करून पहातां आलें नाहीं, कां कोणाशीही घटकाभर बसून विचारविनिमय करता आला नाहीं, कां कोणत्याही संस्थेमध्ये एखाद्या विषयाची सांगोपांग चर्चा करून एखादें व्याख्यान देतां आलें नाही यामुळे आम्हांला असे वाटते की आमचेंच समाधान झाले नाहीं; मग ज्या संस्थांना आह्मी भेटी दिल्या त्यांचें कसं होणार ? असो.

 अहमदनगराहून आह्मी सूर्योदयाचे आंत निघालों तें गोदावरीप्रवरा संगमावर सरासरी आठ वाजतां आलो. नदीमध्ये पाणी सरासरी पंधरा इंच होतें. पण वाळूचें मैदान फार, यामुळे ज्या दिवसांत मोटारी नावेंत घालून पलीकडे नेण्याइतके पाणी नसतें त्या दिवसांत मोटारीस बैल जुंपून त्या पलीकडे नेण्यांत येतात. त्या ठिकाणी बैलाच्या चार पांच जोड्या आसपासच्या शेतकऱ्यांनी तयारच ठेवलेल्या असतात. त्या घासाघीस करून शक्य तितकी जास्त रक्कम मोटारवाल्याकडून उकळून मोटारीस जोडून त्या पलीकडे नेण्यामध्ये या लोकांना बराच फायदा होतो.

 आम्हांला या बैलवाल्या लोकांनी प्रत्येक मोटारीला पांच रुपये घेऊं ह्मणून सांगितलें. आमच्या मोटारी सात झणजे एकंदर ३५ रुपये पडणार ! पण त्याला तरी काय करणार होतों ? कारण दहा अकराच्या दरम्यान औरंगाबादेस येतों ह्मणून शेटजी नागोरी यांस पत्रानें कळविलेले; त्या वेळी जाणे जरूर होते. आणि एकवार मोटार वाळूंत रुतून गेली म्हणजे कसे हाल होतात याचा आम्हांला अनेक वेळां अनुभव आलेला होताच.

 तथापि माणसें उतरून, चाकर माणसांकडून सामान शिरओझ्यांनी पलीकडे नेऊन, आपल्याच माणसांकडून मोटारी रेटून काय होते ते पहावें; आणि नच जमल्यास मग बैल लावून काय खर्च येईल तो करून मोटारी पलीकडे न्याव्यात; असा विचार केला.

 त्याप्रमाणे आम्ही सर्व माणसे मोटारीतून अलीकडील कांठालाच उतरलों जड सामान पेट्या वगैरे चाकरमाणसांकडून पलीकडे नेऊन ठेवविले व एक एक मोटार कांही माणसांनी ढकलून सर्व मोटारी पलीकडे काढल्या !!! बैलवाले गंमत पहातच होते. व प्रथम म्हणालेच. "पहा, मोटारी बैलाशिवाय जाणार नाहीत. उगीच हाल करून घेऊं नका "!! वगैर. पण आमच्या सर्व मोटारी पलीकडे गेल्यावर हिरमुष्टीं तोड करून ते गेले.