________________
वेदकालनिर्णय. वेदकालाचा निर्णय करण्याकरितां ज्या वेदवाक्यांचा आधार घ्यावयाचा ती कशा प्रकारची असतील, हे थोडे पाहिले पाहिजे. वेदकाळी आतांच्या सारखी वेधयंत्रे नव्हतीं हे स्पष्टच आहे. अर्थात् त्या वेळी फक्त डोळ्यांनीच जे दिसेल त्यावरून सर्व अनुमाने बांधावी लागत. ह्मणून त्या डोळ्यांच्या वेधांमध्ये सूक्ष्म गणिताची गरज मुळीच नव्हती. अगदी ढोबळ प्रमाणावरच सर्व गणित होते. अर्थात् वर्षमानही आतांच्या इतकें सूक्ष्म नव्हतें. वर्षांतील निरनिराळे काळ ह्मणजे ऋतु यांचे एक चक्र संपून दुसरे सुरु झाले झणजे दुसरे वर्षही चालू होत असे. त्या वेळी कालमान सर्व लोकांस समजण्यासाठी आतांच्या प्रमाणे पंचांगाची व्यवस्था नव्हती. तरी काही तरी तसें साधन त्या लोकांनी करून ठेविलें होतं यांत संशय नाही. कालमापनाच्या ज्या हल्ली सावन, चांद्र, नाक्षत्र, सौर अशा रीती आहेत, त्याचा वैदिक ग्रंथांमध्ये कोठेही उल्लेख नाही व वेदांगज्योतिषाखेरीज दुसरा कोणताही पंचांग साधनावर जुना ग्रंथ नाही. यासाठी त्यांची कालमापनाची. रीति कशी होती हे फक्त कित्येक वेदांतील उल्लेखांवरून अथवा यज्ञग्रंथांत वर्णन केलेल्या जुन्या दंतकथांवरूनच समजून घेतले पाहिजे. ऋग्वेदांतील कित्येक यागसूक्तांवरून यज्ञयागपद्धती त्या वेळी बरीच प्रौढ दशेस आली होती, हे उघड दिसते, व इतकी स्थिति महिने, ऋतु व वर्ष यांचे चांगले ज्ञान झाल्याशिवाय होणे संभवनीय दिसत नाही. यासाठी त्या वेळी कालनिश्चय करण्यासाठी काही तरी वैदिक ऋषींनी तजवीज करून ठेविली असलीच पाहिजे.