Jump to content

पान:विश्व वनवासींचे.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकाशकाचे मनोगत देश स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या ७० वर्षांमध्ये भारतीय सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्टीने जे बदल घडून आले आहेत त्या सर्वांचा विचार करताना सामान्यपणे देशामधील शहरी व ग्रामीण जनतेचा विचार केला जात असल्याचे दिसून येते. आजही देशामधील एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के असलेल्या वनवासी समाजाकडे ज्या प्रमाणात लक्ष जावयास पाहिजे तसे जाताना दिसत नाही. एकूणच वनवासी विश्व उपेक्षितच राहिले आहे. काही गैर सरकारी संघटना व विशेष करून वनवासी कल्याण आश्रम गेली ६० वर्षांहून जास्त वनवासी क्षेत्रांमध्ये कार्य करून वनवासींचे जीवनमान उंचावण्यास यशस्वीरित्या मदत करीत आहे. वनवासी समाजाचीपण एक वैशिष्ट्यपूर्ण लोकसंस्कृती आहे. त्यांचेपण एक सांस्कृतिक जीवन आहे. त्यांचे लोकसाहित्य आहे, लोकसंगीत व लोकनृत्य आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशी त्यांची नीतिमत्ता व सौंदर्यशास्त्र आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने वनवासींच्या ह्या जीवनाची अन्य समाजाला ओळख होणे आज अत्यावश्यक आहे. डॉ. भास्कर गिरधारी हे नोकरी निमित्ताने १० वर्षे जव्हारला होते. त्या काळात त्यांनी वनवासींचे जीवन जवळून पाहिले, त्याचा अभ्यास केला व त्याचे फलित म्हणजे त्यांनी लिहिलेले 'वनवासी विश्व' नावाचे पुस्तक. __उर्वरित समाजाला वनवासींचे जीवन, त्यांची जीवनशैली इत्यादींची ओळख होण्यास डॉ. गिरधारींचे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे असे वाटल्यामुळे आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. वाचक ह्याचे चांगले स्वागत करतील असा विश्वास वाटतो. भारतीय विचार साधना प्रकाशन भाविसा भवन, १२१४/१२१५, सदाशिव पेठ, पेरूगेट भावे हायस्कूल परिसर, पुणे - ३०. दूरभाष : ०२०-२४४८७२२५ ई-मेल : bhavisapune@gmail.com, bhavisa@bookbharati.com