पान:विवेकानंद.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



हृदूत.

 प्रस्तुत खंडही आह्मांस ठराविक मुदतींत प्रसिद्ध करता आला नाहीं याबद्दल आम्ही अत्यंत दिलगिर आहों. अपरिहार्य अडचणींची शिळी सबब पुढे करूं नये अशी आमची अत्यंत उत्कट इच्छा होती, परंतु लंगड्याने वाट सांगावी आणि आंधळ्याने चालावे, अशी स्थिति असली म्हणजे एका दिवसाचा रस्ता तोडण्यास चार दिवस लागावे यांत नवल कसले याकरितां या दिरंगाईबद्दल वाचकवर्ग आह्मांस क्षमा करील अशी आशा आहे.
 आम्ही आरंभिलेल्या या कार्यात निरपेक्ष बुद्धीने ज्यांनी आह्मांस साहाय्य केले, त्यांचे आभार मानणे युक्त आहे. कोणतेही सत्कार्य आपलेच आहे, असे समजून त्या कार्यात मदत करणारे लोक आम्हां महाराष्ट्रीयांत थोडे तरी आढळतात आणि अशा सद्गृहस्थांच्या मदतीने आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने हे कार्य आम्ही शेवटास नेऊ असा भरंवसा आह्मांस आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांचे भोक्ते, केव्हाही झाले तरी बेताचेच असावयाचे, असा सामान्य अनुभव आहे, आणि हा अनुभवच लेखक आणि प्रकाशक यांस निरुत्साह करण्यास कारणीभूत होत असतो.
 आतां आणखीही एका प्रकारच्या लोकांचा उल्लेख करणे आवश्यक झालें आहे. पुस्तकें मागवून मग व्ही. पी. परत करणारा वाचकवर्ग आम्हां महाराष्ट्रीयांमध्ये उपेक्षा न करण्या इतका मोठा झाला आहे, हे आम्हां प्रकाशकांचे खरोखर मोठे दुर्दैवच आहे! अशा प्रकारच्या वाचकवर्गाने पुस्तकें न मागविली तर तेच आम्हांस मोठे साहाय्य झाले असे समजूने त्यांचे आम्हीआभारी होऊ.
 अशा प्रकारच्या अनेक अडचणींस तोंड देऊन आम्हांस आमचा मार्ग काढावयाचा असल्यामुळे थोडा अधिक वेळ लागल्यास वर्गणीदारांनी रागावू नये अशी विनंति आहे.
 पुढील खंड मार्च महिन्यांत प्रसिद्ध होईल.
मुंबई,
ता. २५-११-१३.)

प्रकाशक