पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७८)

द्रव्यार्जन, सगोत्र विवाह, इत्यादि या बाबतीतल्या बहुतेक सर्व महत्वाच्या प्रश्नांचा विचार आपण केला. या बाबतीत आणखीही काही कल्पना प्रचलित आहेत. गांधर्वपद्धतीने विवाह केल्यास एक प्रकारची संतती होते, ब्राह्मपद्धतीने केल्यास दुसऱ्या प्रकारची, क्षत्रियांना, विवाहाचा एक प्रकार हितकर तर ब्राह्मणांना दुसरा व वैश्यांना अगदीच निराळा हितकर, विवाहानंतर प्रथम होणारी संतती चांगली सुदृढ व बुद्धिमान असते, व पुढील दुबळी असते किंवा आरंभीची दुबळी असून पुढची सुदृढ असते इत्यादि अनेक समज आपल्याकडे रूढ आहेत. पण शास्त्र या पदवीच्या आसपासही येण्याची त्यांची योग्यता नसल्यामुळे त्यांचा विचार येथे केला नाही.
 गेल्या दोनतीन लेखात अर्वाचीन शास्त्राअन्वये विवाहसंस्थेचे जे स्वरूप असावयास हवे आहे त्याचे दिग्दर्शन केले. त्याअन्वये आपल्या समाजात सुधारणा झाल्या तर येथले बरेच सामाजिक प्रश्न सुटतील, आणि त्यामुळे येथील अनेक दुखे कमी होऊन समाजाच्या सुखात व सामर्थ्यात बरीच भर पडेल असे वाटते. समाज नव्या शास्त्रीय विचाराला व तदनुसारी कृतीला कितपत तयार आहे, यावर सर्व अवलंबून आहे.