दृष्टीनेही तेच इष्ट आहे. पण अपत्य आणि अर्थिक स्वातंत्र्य यांचा सध्याच्या समाजव्यवस्थेत तर फारच विरोध आहे. बाळंतपणाच्या आधी व मागून काही महिने स्त्रीला पूर्ण विश्रांतीची जरूर असते. आणि नोकरी किंवा दुसरे कोणचेही स्वतःच्या अंगावर घेतलेले काम करूनही विश्रांती घेणे तिला शक्य नाही. त्याचप्रमाणे अर्थार्जनासाठी दिवसातून ७|८ तास तरी तिला पूर्ण मोकळीक असली पाहिजे. अपत्यसंगोपन अंगावर घेतल्यावर स्त्रीला ती मिळणे शक्य नाही. आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विवाह झाल्यानंतर स्त्रीला अर्थार्जन केवळ अशक्य होऊन बसले आहे. युरोप अमेरिकेतही विवाहानंतर द्रव्यार्जन करणाऱ्या स्त्रिया फारच थोड्या असतात.
स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य व अपत्यसंगोपन यातील ही तेढ सोडविण्यास अनेकांना अनेक उपाय सुचविले आहेत. कोणी म्हणतात की अपत्याचे उत्पादन व संगोपन हे एक सामाजिक कार्यच समजावे व इतर कामासाठी जसे व्यक्तीला आपण वेतन देतो, तसे या कामासाठी द्यावे. पतीच्या प्राप्तीपैकी काही भागावर स्त्रीचा कायद्याने हक्क ठेवावा असे काही म्हणतात. पण रशियाने या बाबतीत फार सुरेख व्यवस्था केली आहे. स्त्री कोणत्याही ठिकाणी कामावर असली तरी तिला बाळंतपणाच्या आधी व मागून दोन- दोन महिने भरपगारी रजा मिळावी, असा तेथे कायदा आहे. या कायद्याने त्या दिवसांतही काम केल्यामुळे गर्भावर होणारे वाईट परिणाम टळले. क्रेश या संस्था स्थापून सरकारने दुसरीही अडचण नाहीशी केली आहे. क्रेश या बालकांच्या संस्था असून तेथे दिवसांतून ७|८ तास मुले संभाळण्याची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक कारखान्याशेजारी अशा संस्था असून त्या मुलांना पाजण्यासाठी दर तीन तासांनी आयांना अर्धा तास सुट्टी मिळण्याची सोय असते. या व्यवस्थेमुळे स्त्रीच्या मार्गातल्या सर्व अडचणी नाहीशा झाल्या असून तिला आर्थिक स्वातंत्र्य व अपत्यवात्सल्य ही दोन्ही सुखे मिळविणे सुलभ झाले आहे शिवाय मातेपासून बालक कायमचे वियुक्त करण्यात जे तोटे असतात तेही येथे नाहीत. उलट पाचसहा तास मूल निराळे झाले तर बरेच असते. आणि मुलालाही आरोग्याची तपासणी, समवयस्क मुलाची संगत, खेळण्याचे अनेकविध प्रकार हे मिळून पुन्हा घरही मिळते. म्हणजे त्या दृष्टीनेही ही व्यवस्था उत्तम आहे.
पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१७६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७०)