पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४३)

मजचि जैं मरण आलें । तें काय करितील स्त्रिया वाळें आसवीं डोळे लोटतीं ॥ अशी खंती पुरुष करतो म्हणून एकनाथमहाराजांनी त्याला मूढगती म्हटले आहे. (एकनाथी भागवत १७।५२४.) पण ही उदाहरणे कशाला ? संसाराची निंदा करण्याचे सुख जिव्हेने भागले नाही असा सत्पुरुषच आपणास सापडणार नाही पण विवाहसंस्थेचे अद्भुत यश यातच आहे की हे ऐकून लोकांनी तर संसार सोडले नाहीतच पण या साधूसंतांनीही ते सोडले नाहीत. आलिप्तपणे का होईना, भोगायचे नाही अशा इच्छेने का होईना ते संसारसुख भोगीतच राहिले. आता लोकांनी संसार सोडले नाहीत तरी ज्ञान विन्मुखता, तर्कशून्यता, कर्तृत्वाबद्दल निराशा इत्यादी अनेक दुर्गण या उपदेशामुळे उत्पन्न झालेच; पण विवाहसंस्था अजिबात ढासळली नाही हे काय थोडे झाले ? तेव्हा वेदान्ताच्या प्राणघातक हल्ल्यातूनही जी संस्था सहीसलामत बाहेर पडली तिला, सर्वस्वी अनुकूल असलेल्या पाश्चात्यांच्या काही तपशिलातल्या सुधारणांनी भय उत्पन्न होईल, अशी भीती बाळगणे अगदीच असमंजसपणांचे होईल.


गृहसंस्थेचे नवे स्वरूप


 विवाह आणि गृह या संस्थेवर कितीही जहरी टीका होत असल्या त्यावर कितीही जोराचे हल्ले होत असले तरी त्या ढासळून पडणार नाहीत व पडू नयेत अशीच सर्व विचारी पु षांची इच्छा आहे, हे मागील प्रकरणी आपण पाहिले पण त्याबरोबरच आपल्या असेही ध्यानात आले की या दोन्ही संस्था जर चिरंजीव करावयाच्या असतील तर त्यांच्या स्वरूपात व रचनेत आपणांस आमूलाग्र फरक केला पाहिजे. गेल्या दोन हजार वर्षांत व विशेषतः गेल्या दीडशे वर्षांत समाजाच्या स्थितीत, माणसांच्या मनोभावनात, नैतिक मूल्यात इतके जमीनअस्मान फरक पडले आहेत की जुन्या तत्वावर चालविलेली कोणतीही संस्था या कालात टिकून राहणे अगदी अशक्य आहे.