पान:विचार सौंदर्य.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कै. वा. म. जोशी ( १८८२-१९४३ ) यांचें वाङ्मय म्हणजे सत्यं, शिवं व सुंदरम् यांचा चित्तवेधक, संगमच. त्यांच्या मनोहर कल्पना- विलासास नेहमींच 'परतत्त्वाचा स्पर्श' झालेला असल्यानें त्याची उंची आपोआप वाढलेली असते. त्यांच्या परतत्त्वाच्या चर्चेस लालित्याची संगत नेहमींच असल्यानें ती सर्वांना सुलभ, पुन्हा पुन्हां अनुभव घ्यावा अशी बनलेली असते. कै. वामनराव जोशी यांनी आपले तत्त्वविचार, नीति- विचार, देवधर्मात्मक विचार, राजकारण-समाज कारणात्मक विचार कथांच्या रूपानें सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रागिणी, नलिनी, सुशी- लेचा देव, आश्रम हरिणी, इंदू काळे व सरला भोळे इत्यादि त्यांच्या कादं- बऱ्यातून मनोहर कल्पनाविलास व चित्तवेधक कथानक यांचेबरोबरच तत्त्वचर्चेचा सुगंधी वर्षाव पानोपानी दिसून येतो. तत्त्वज्ञ कथाकार म्हणजे कै. वा. म. जोशी.

 'विचार सौंदर्य ' या त्यांच्या पुस्तकांत कांहीं साहित्य विषयक मतांची सुबोध मूलगामी व उद्बोधक चर्चा त्यांनी केलेली आहे. महा- काव्यांची निर्मिती, केळकरांची साहित्यमीमांसा, वाङ्मयाचें ध्येय, वाङ्मय- कलेचीं विविध अंगें, डॉ. केतकरांच्या कादंबऱ्या यांसारखे महत्त्वाचे प्रश्न घेऊन कै. वा. म. जोशी यांनी आपल्या नेहमींच्या खेळकर व सुबोध शैलीनें त्यांच्या गांभीर्यास धक्का न लागेल अशा पद्धतीने चर्चिले आहेत. या पुस्तकांतील सर्व विवेचन विचारांतील सौंदर्य जोपासून झालेले दिसेल, सौंदर्याचें वैचारिक अंग सांभाळून झालेले दिसेल. कै. वा. म. जोशी यांचें ‘विचार सौंदर्य ' हैं एक मराठींत साहित्यविषयक प्रश्नांवरील अप्रतीम पुस्तक मानले जातें.

व्हीनस प्रकाशन : ४१० शनवार पेठ : पुणे २