पान:विचारसौंदर्य.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

 हास्यरसाचे विवेचन करतांना केळकरांनी हास्यास्पद व हास्योत्पादक गोष्टींमध्ये जो फरक दाखविला आहे तो महत्त्वाचा व मननीय आहे. त्याचप्रमाणे शाब्दिक विनोद हा विनोद आहे, पण तो प्रसंगनिष्ठ विनोदापेक्षा हलक्या दर्जाचा आहे असे केळकर म्हणतात तें ध्यानांत धरण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे केवळ आत्यंतिक अतिशयोक्तीवर आधारलेला विनोदहि खालच्या पायरीचाच आहे हेहि त्यांचे म्हणणे हल्लींच्या विनोदी लेखकांनी मनन करण्यासारखे आहे. विनोद करणाऱ्याच्या मनांत कटुता, द्वेष, तिरस्कार, गर्व वगैरे असल्यास त्याच्या विनोदाचे स्वरूप सात्त्विक व उच्चतम राहू शकत नाहीं हे, तसेंच विनोदबुद्धीमध्ये अनेक रंगांचे व अनेक प्रकारचे पापुद्रे असतात आणि ती संमिश्र स्वरूपाची आहे हैं, केळकरांनी ओळखले आहे व पुढील अत्यंत मार्मिक वाक्यांत ते थोडक्यांत दिग्दर्शित केले आहे. ते म्हणतातः “ विनोदी हास्य ऐकतांच त्या हांसणाराच्या मनांत शांतता, खेळकरपणा, आनंद, सहिष्णुता, विचारीपणा, सात्विकपणा, उदारभाव, व ममता इत्यादि सर्व किंवा यांतील काही तरी भाव मुख्यत्वेकरून वसत आहेत अशी ऐकणाराच्या मनाची खात्री होते व विनोदाच्या अनेक विभावांच्या जाति लक्षात घेतल्या असतां खन्या व अस्सल विनोदी माणसांत हे वर सांगितलेले गुणच असले पाहिजेत हे कळून येणारे आहे. " 'खरे व अस्सल' विनोदी लेख नसतील त्यांच्या विनोदांत तिखटपणा, अंबटपणा, बोचकपणा असतो. 'विनोद' या सदरांत जरी त्याची गणना केलीच पाहिजे तरी तो सात्त्विक व उच्चतम ( किंवा केळकरांच्या भाषेत 'खरा व अस्सल') नाही हे विसरून चालावयाचे नाही. गडकऱ्यांच्या विनोदांतील कोटया लोकांच्या ध्यानात राहतात, पण त्यांचा खरा अस्सल विनोद धुंडिराजपंतांविषयींच्या विनोदांत दिसून येतो. हास्यामध्ये अनेक प्रकार आहेत, त्याचे विस्ताराने वर्णन करण्याचे कारण नाही; एवढे मात्र सांगि- तले पाहिजे की, उच्चतम हास्य जे आहे त्यास द्वेषाचा वगैरे संस्पर्श होऊन ते दूषित झालेले नसते, तर ते प्रेमगर्भ असते. 'शांतता, खेळकरपणा, आनंद, सहिष्णुता, औदार्य, ' इत्यादि केळकरांनी सांगितलेल्या उच्च मनोवस्था त्याच्या मुळाशी असल्यामुळे तो सात्त्विक लोकांना रुचतो, व समाजोपकारक होतो. खया विनोदाचें थोडक्यांत लक्षण करावयास मला कोणी सांगितले तर मी 'हास्योत्पादक गोष्टींचें प्रेमगर्भ व खेळकर वृत्तीने केलेले चिंतन' असें करीन,

४४