पान:वाटचाल (Vatchal).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मामा : रामचंद्रराव नांदापूरकर : ३१

दादा नुसते बुद्धिमान नव्हते. एखादा विषय चटकन त्यांची बुद्धी आकलन करीत असे. सूक्ष्म गुंतागंत अतिशय व्यवस्थित रीतीने उलगडीत ते प्रश्नांच्या गाभ्यापर्यंत जात. वकिलीच्या व्यवसायात ते शिरले. तिथे त्यांनी नाव कमावले. पैसाही भरपूर मिळविला. पण ही वकिली उच्च न्यायालयातली होती. त्यामुळे कायद्याचा बारीक सारीक कीस काढण्याला महत्त्व असे. दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही क्षेत्रांत ते यशस्वी होते. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते वेस्टर्न इंडिया बार असोसिएशनचे अध्यक्षही राहिलेले होते. दादा वकिली न करता प्राध्यापक झाले असते तर विविध विषयांवर विपुल ग्रंथरचना करणारे चौरस विचारवंत म्हणून महाराष्ट्रात गाजले असते.
 मोठे मामा अतिशय रसिक आणि अभ्यासू होते. समतोल आणि कष्टाळू असे मराठी भाषेचे व वाङमयाचे ते उपासक होते. दादांना अविषय नव्हता. वाङमय, धर्म, नीती, तत्त्वज्ञान, विज्ञान, कायदा, अशी सर्वसंचारी त्यांची बुद्धी होती. दादा पक्के जडवादी, नास्तिक आणि मार्क्सवादी होते. मी त्यांची मार्क्सवादावरील व्याख्याने ऐकलेली आहेत. त्याबरोबरच भारतीय संविधानावरील व्याख्यानेही ऐकलेली आहेत. अभिरूप न्यायालयात ' नागकन्या' या कादंबरीच्या निमित्ताने चर्चा चाललेली असताना, कायदा बाजूला ठेवून वाङमयनिर्मिती व आस्वाद या चर्चेला प्राधान्य देऊन 'नागकन्या' कादंबरीच्या अकल्पिकतेची त्यांनी केलेली मीमांसाही ऐकलेली आहे. आमच्या सीतामामींना आपला नवरा म्हणजे अतिशय हुशार व बुद्धिमान असे नेहमीच वाटत आले. हा नुसता पत्नीला वाटणारा पतीचा अभिमान नाही, ते सत्यही आहे. म्हणूनच माझे मत असे आहे की, तिघेही भाऊ बुद्धिमान, अभ्यासू व हुशार, पण मधल्या मामांची बुद्धिमत्ता ही काही निराळीच होती. अतिशय मोठी अशी त्यांच्या विचाराची झेप होती.
 दादा अतिशय बुद्धिमान होते, कर्तबगार होते; त्यांनी खूप पैसा मिळविला हे खरेच आहे, पण यापेक्षा मला अतिशय आवडणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे पैशाच्या बाबत ते नेहमीच निर्मोही होते. द्रव्याबाबत उदार आणि उदासीन, पण तरीही व्यवहार जाणणारी आणि तत्पर अशी जी माणसे माझ्या पाहण्यात आहेत, त्यांन दादांच्या व्यक्तिमत्वामुळे मी नेहमीच प्रभावित झालो आहे. तसे दादा काही गर्भश्रीमंत नव्हते. मोठ्या मामांच्याप्रमाणे त्यांना वार लावून शिकावे लागले नाही. पण प्रतिकूल परिस्थिती त्यांनीही खूपच अनुभवली. वडील भावाचे जुने कपडे दीर्घकाळ त्यांनी वापरले. दहाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पण ते अठ्ठावीस वर्षांचे होईपावेतो त्यांना कधी पत्नीला घेऊन घरसंसार करण्याची संधी आली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात टंचाई नेहमीच असे. थोडा धंद्यात जम बसावा तो नव्या जेलयात्रेची तयारी होई, सगळी मांडलेली घडी विस्कटून जाई. पण पैशाची फिकीर