पान:वाचन.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
वाचन.

बाण, या संस्कृत कवींच्या; तसेंच मुकुंदराज, श्रीधर, वामन, मोरोपंत, तुकाराम, एकनाथ, ह्या महाष्ट्रकवींच्या श्रवण, मनन आणि अवलोकनांतून पूर्वीचे बरेच ग्रंथ गेले होते. ज्ञाना- र्जनाच्या व ज्ञानप्रसाराच्या कामी त्यांनी आपले सर्व आयुष्य बेंचिलें ! पैसा जोडावयास ज्याप्रमाणे सतत उद्योग लागतो, त्याप्रमाणे ज्ञानार्जनाच्या कामीही सतत परिश्रम करावे लागतात. 'थेंबे थेंबे तळे साचे' या ह्मणीप्रमाणे ज्ञान हैं अल्प अल्प अंशाने प्राप्त होऊन सतत परिश्रमानें त्याचा समुद्र बनतो.
 लोकांत मान्यता किंवा प्रसिद्धी होण्यास कित्येक ग्रंथकारांस पुष्कळ वर्षे लागली. बहुतेक ग्रंथकार मध्यवयांत किंवा उत्तरवयांत प्रसिद्धीस आले. टेनिसन आपल्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी उत्तम कवि हाणून ठाऊक झाला. ब्राउनिंग हा साठ वर्षांचा होईपर्यंत तो उत्तम कवि आहे, हें लोकांस मुळींच माहीत नव्हतें. गोल्डस्मिथ यानें 'डेझर्टेड व्हिलेज' (ओसाडगांव) हैं सुरस काव्य आपल्या वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध केलें, तेव्हांपासून त्याची ख्याति झाली. मिल्टन कवीनें 'प्याराडाईस लॉस्ट (स्वर्गपतन) व प्याराडाईस रिगेंड (पुनः स्वर्गारोहण) हीं उत्तम काव्यें आपल्या हातारपणी लिहिली. यावरून आमच्या वाचकांनी हे लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, नुसती बुद्धि असून तिचा फारसा उपयोग होत नसतो, तर त्या बुद्धीस वाचनरूपी जीवन घालून ती वृद्धिंगत केली पाहिजे, व सतत परिश्रम करून आपल्या आंगीं विशेष विद्वत्ता आहे, असें जगाच्या प्रचीतीस आणून दिलें पाहिजे.