Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझे वडील वसंतकाका! ९ मे १९१६ रोजी माझे वडील वसंतराव माधवराव घाटगे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काय करता येईल, याचा विचार करण्यासाठी २०१५ साली आम्ही कुटुंबीयांनी अनौपचारिक अशा स्वरूपाची एक वसंतराव घाटगे स्मृती समिती स्थापन केली. आमच्यात झालेल्या परस्परचर्चेनुसार त्यांच्या जीवनावर आधारित एक छोटा पंधरा-वीस मिनिटांचा लघुपट तयार करायचे आम्ही घाटगे कुटुंबीयांनी ठरवले व २०१६ सालात आम्ही तो तयारही केला. वडिलांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त कोल्हापूरच्या हॉटेल सयाजीमध्ये भारत फोर्ज लिमिटेडचे चेअरमन बी. एन. ऊर्फ बाबा कल्याणी व लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे २०१६ रोजी झालेल्या एका समारंभात तो दाखवला गेला आणि सर्वच प्रेक्षकांनी त्याचे चांगले स्वागत केले. ह्या लघुपटनिर्मितीच्या संदर्भात आम्ही कुटुंबीय अधूनमधून भेटत असू व त्या वेळी वसंतकाकांच्या आठवणींना उजाळा मिळत असे. आम्हां सर्वांचेच त्यांच्यावर प्रेम असले, तरी त्यांच्या जीवनातील सर्वच घट आमच्यापैकी प्रत्येकाला माहीत होत्या असे नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अपरिचित पैलू आणि वाटचालीतील वेगवेगळी वळणे अशा गप्पांमध्ये पुढे येत असत. एखाद्या लघुपटात त्यातले काय काय दाखवता येईल ह्याच्या काही मर्यादा होत्या व त्यांचे एकूणच जीवन विस्ताराने शब्दबद्ध व्हायची गरज त्या वेळी आम्हांला सतत जाणवत गेली. तसे चरित्र वसंतवैभव | ०७ ।