करायची इच्छा प्रकट केली. माई मांसाहार पूर्ण निषिद्ध मानणाऱ्या; पतीची इच्छा पुरवण्यासाठी त्यांनी हसूरचंपू गावातील आपल्या ओळखीच्या एका मुसलमान स्वैपाक्याला कोल्हापुरात बोलावून घेतले व त्याच्याकडून वसंतरावांना हवे ते पदार्थ त्या पानात वाढू लागल्या. प्रथिनयुक्त असा सामिष आहार त्यामुळे रोज मिळू लागला. या आहारातून वसंतरावांची शक्ती वाढत गेली, हालचाली पूर्ववत होत गेल्या. कोणाचा विश्वासही बसू नये इतक्या झपाट्याने फरक पडत गेला. एक दिवस 'मी आता पूर्ण बरा झालो आहे' असे त्यांनी स्वतःच जाहीर केले. एक्सरे काढल्यावर त्यांचा दावा खरा होता हे सिद्ध झाले. केवळ प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर त्याकाळी असाध्य मानल्या गेलेल्या ह्या रोगावर वसंतरावांनी मात केली होती. हे साधारण १९४५ सालच्या मे- जून महिन्यात घडले असावे. 'रोगातून बाहेर पडलो; पण आता कामधंद्यासाठी पुढे काय करायचे, ' हा मोठाच प्रश्न आता वसंतरावांपुढे उभा राहिला. त्यांनी दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वाहतुकीच्या धंद्याची तशी दीर्घकालीन शाश्वती नव्हती. सुरुवातीच्या काळात ते व्यवसाय करत असताना एकीकडे कॉलेजचा पगार नियमित चालू होता. त्यामुळे व्यवसाय कसाही चालला तरी पगारात घर चालेल ह्याची खात्री होती. व्यवसायातून थोडेफार मिळणारे पैसे हा केवळ 'बोनस' समजला जात होता; पण आता कॉलेजातली नोकरी गेल्यामुळे नियमित उत्पन्नाचा कुठलाच स्रोत राहिला नव्हता; परिस्थिती एकदम पालटली होती. 'उत्तम नोकरी, मध्यम शेती आणि कनिष्ठ धंदा' अशा विचारांचा त्या वेळी मराठी मध्यमवर्गावर पगडा होता; घाटगे कुटुंबही त्याला अपवाद असायचे काहीच कारण नव्हते. लग्नानंतरच्या त्या पहिल्या पाच वर्षांत पदरी दोन लहान मुली आल्या होत्या; नवा संसार होता. एकूण घरची आर्थिक परिस्थितीही फार काही चांगली होती अशातला भाग नव्हता. गेल्या वर्ष-दीड वर्षातला आजारपणाचा खर्च भागवता - भागवताच घरचे सगळे साठवलेले पैसे संपले होते. तशात चार वर्षे केलेली आणि आवडणारी नोकरी जाणे हा मोठाच घाला होता. असे असतानाही वसंतराव हातपाय गाळून बसले नाहीत. 'Best comes out of you, when you are up against the wall' ('समोरचे सगळे मार्ग खुंटतात, तेव्हा तुमच्यातले सर्वोत्तम ते बाहेर येते) असे वसंतवैभव | ४२ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/४४
Appearance