कंपनी कोल्हापुरात सुरू केली होती व त्यातही वसंतरावांना खूप रुची असायची. ताम्हाणे यांनी त्यांच्या कंपनीचे आणि कुटुंबाचेही अधिकृत छायाचित्रकार म्हणून पुढे बरेच काम केले. आपल्या या तंत्रज्ञानप्रेमाचा आपल्या व्यवसायातही वसंतरावांना भरपूर फायदा व्हायचा. वाहनासाठी हजारो सुटे पार्ट्स लागत आणि त्यांची सविस्तर व सचित्र माहिती देणारे कॅटलॉग्ज मूळ विदेशी उत्पादकांकडून देशातील मुख्य डिस्ट्रिब्युटर्सना व त्यांच्याकडून डीलर्सना मिळत. पुढे गि-हाइकाला सर्व्हिस देण्यासाठी ते अत्यावश्यक असत. परदेशात छापले जाणारे हे रंगीबेरंगी कॅटलॉग्ज चांगले जाडजूड, तीन-चारशे पानांचे असत. अशा कॅटलॉग्जचा वसंतराव अगदी बारकाईने अभ्यास करत असत. प्रत्येक पार्टचा नेमका उपयोग काय, याची त्यांना तांत्रिक माहिती असायची. त्याचबरोबर मुंबईतील मुख्य मार्केटचा पुरता अनुभव घेतलेला असल्याने तो पार्ट आयत्या वेळी कुठे उपलब्ध होईल याची खडान्खडा माहितीही त्यांना असायची. वसंतरावांचा तिसरा विशेष म्हणजे त्यांची विश्वासार्हता. एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर ते ती उत्तम प्रकारे पार पाडणार, ह्याची सर्वांना खात्री असायची. व्यवसायाच्या दृष्टीने हा मोठा गुण होता. सातत्याने चांगली सेवा देऊन उद्योगक्षेत्रात त्यामुळेच कंपनीने नाव कमावले होते. उत्तम व्यवसाय करून कमावलेल्या व जपलेल्या ह्या विश्वासार्हतेमुळेच नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये छापलेल्या नोटा असोत की मुंबई एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असोत, घाटगे-पाटील कंपनीकडे एकदा माल दिला, म्हणजे तो बुकिंग करताना सांगितलेल्या वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोचणारच ह्याची खात्री ग्राहकांना वाटत असे. त्यामुळेच जोखमीची कामेही त्यांच्यावर बिनदिक्कत सोपवली जात व त्यातूनच त्यांना सतत रिपीट ऑर्डर्स मिळत गेल्या. ह्या विश्वासार्हतेचाच एक भाग म्हणजे व्यवहारातला चोखपणा. कंपनीच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणात जयकुमार पाटील यांनी सांगितलेला एक प्रसंग इथे नमूद करण्यासारखा आहे. आपल्या आर्थिक व्यवहारात कंपनी किती चोख असायची व त्याचा एक परिणाम म्हणजे बँकांच्या नजरेत कंपनीची पत कशी उच्च बनली वसंतवैभव | २४२ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२७६
Appearance