“एरव्ही आपल्या समाजात ड्रायव्हरला काहीच किंमत नसते, त्याला स्वतःलाही आपल्या नोकरीत कमीपणाच वाटत असतो; पण ' घाटगे-पाटील कंपनीत ड्रायव्हर आहोत' याचा त्या ड्रायव्हर्सना अभिमान वाटायचा, चारचौघांत ते त्याचा अभिमानाने उल्लेख करत, ड्रायव्हर सोडाच, एखाद्या साध्या क्लीनरलाही तो जर घाटगे-पाटीलमध्ये नोकरीला असेल, तर त्या नोकरीचा अभिमान वाटायचा. हा अभिमान केवळ तुम्हांला किती पगार मिळतो यावर अवलंबून नसतो, तुम्ही जिथे काम करता त्या कंपनीला समाजात काय स्थान आहे, ह्यावरही तो अवलंबून असतो. घाटगे-पाटील कंपनीतल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आपण ह्या कंपनीत कामाला आहोत, ह्याचा अभिमान वाटायचा. हा अभिमान म्हणजे वसंतरावांच्या कार्याची मोठी पावतीच आहे." वसंतराव मूळचे ज्ञानमार्गी; पण आयुष्याने त्यांना कर्ममार्गी बनवले. वसंतरावांनी कधी व्याख्याने दिली नाहीत, लेख लिहिले नाहीत; त्यांना जे काही सांगावेसे वाटले, ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. वेळोवेळी जीवनात जे प्रसंग आले, त्यांना त्यांनी कसे तोंड दिले, माणसे कशी जोडली, व्यवसाय कसा वाढवला, प्रत्येक संकटाचे संधीत कसे रूपांतर केले या साऱ्यातूनच त्यांची जीवनविषयक भूमिका आपल्याला दिसून येते. ही भूमिका हाच त्यांचा वारसा म्हणता येईल. आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात कंपनीने स्वतःसाठी तयार केलेले नीतिसंकेत (Code of Ethics) या संदर्भात अभ्यास करण्यासारखे आहेत. त्यात म्हटले आहे : १. आम्ही जे काम करतो त्यासंदर्भातील आमचे ज्ञान वाढवायच्या प्रत्येक संधीचा आम्ही उपयोग करून घेऊ. २. आम्ही आमच्या कामात फक्त असेच सुटे भाग आणि अशीच साधने वापरू ज्यांची सुरक्षितता वादातीत आहे. ३. आम्ही सर्वोत्कृष्ट आणि फक्त सर्वोत्कृष्ट दर्जाचेच काम करू. ४. आम्ही ग्राहकांच्या वाहनांची देखभाल करताना जे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असेल, तेवढेच काम करून घ्यायची शिफारस त्यांना करू. ५. आम्ही स्वतःच्या मालकीच्या वाहनांची जेवढी काळजी घेतली असती, तेवढीच काळजी आम्ही ग्राहकांच्या वाहनांची घेऊ. वसंतवैभव | २२८ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२६२
Appearance