Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“घाटगेमामांनी आणि माझ्या बाबांनी खूप प्रकारचे व्यवसाय एकत्र काढले. मला आठवतं, दोघांनी एकदा एका टुरिंग टॉकिजवाल्याला ट्रक दिला होता. त्याची वसुली करण्यासाठी हे दोघेही ज्या वेळी या टुरिंग टॉकिजवाल्याकडे जात, त्या वेळी तो ह्या दोघांना म्हणत असे, 'धंदा आत्ताच चालू केला आहे. गल्ला जमला की पैसे देतो. तोपर्यंत सिनेमा बघा. “त्यांनी कोल्हापुरात एक आइस फॅक्टरीदेखील सुरू केली. त्या वेळी कोल्हापुरात कुठलीच आइस फॅक्टरी नव्हती. ती आइस फॅक्टरी उभारणारे कंत्राटदार म्हणजे मुंबईला राहणारे दोन परदेशी इंजिनिअर होते. ते होते लार्सन आणि टुब्रो, प्रख्यात एल अँड टी कंपनीचे संस्थापक ! मला आठवतं, खूप वर्षांनी जॉन डीअर एल अँड टी या कंपनीची सुरुवात पुण्यामध्ये ६ ऑक्टोबर २००० रोजी झाली, त्या वेळी ९६ वर्षांचे हॉक लार्सन पुण्याला आले होते व त्या कार्यक्रमात मला ते भेटले होते. मी माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी आमच्या त्या आइस फॅक्टरीची आठवण काढली होती. म्हणजे इतक्या वर्षांनंतरही ते काम त्यांच्या लक्षात होतं! “घाटगेमामा आणि बाबा दोघेही खूप उदार होते. इतरांना मदत करायला त्यांना आवडायचं. त्या काळी त्यांनी मुंबईत फ्लोरा फाउंटनसारख्या मोक्याच्या जागी एक भाड्याचा फ्लॅट घेतला होता; त्यांच्यापेक्षा ज्यांना मुंबईला जायचे असेल असे त्यांचे कोल्हापुरातले इतर मित्रच तो वापरत! खूपदा ह्या दोघांनाच मग हॉटेलात राहावं लागे ! म्हणून मग शेवटी त्यांनी तो काढून टाकला. “आयुष्यातला पहिला विदेश प्रवास दोघांनी एकदमच केला. १९६२ साली ते दोघे प्रथम अमेरिकेला गेले. शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्यांना बरोबर नेलं होतं. ट्वीन डिस्क कंपनीबरोबर शंतनुराव करार करणार होते. त्यांनी मरीन गिअर बॉक्सेस बनवण्यासाठी त्यांच्या किर्लोस्कर न्यूमॅटिक ह्या कंपनीसाठी तो करार केला; पण त्याच वेळी ट्वीन डिस्क कंपनी बनवत असलेले इतर काही छोटे प्रॉडक्ट्स आम्हीही भारतात तयार करावेत, असा सल्ला शंतनुरावांनी दिला. ह्या दोघांना ही कल्पना आवडली. त्यातूनच मग आम्ही industrial applicationsसाठी Power Takeoffs आणि Clutches बनवायला लागलो. त्या अमेरिकन कंपनीचे केनेडी म्हणून प्रमुख होते. त्यांनी एक खासगी विमान घाटगेमामा आणि बाबांना अमेरिका बघण्यासाठी म्हणून जवळ जवळ एक महिन्यासाठी वसंतवैभव | २१२ ।