Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्यक्रमात वसंतकाका सगळ्यांसमोर जादूचे प्रयोग करायचे ते मला स्पष्ट आठवतं. ते काचा खायचे, ब्लेड खायचे! एकदा मी स्वतः ही त्यांना काचा खाताना बघितलं आहे! सगळ्या उपस्थितांनी त्या वेळी टाळ्या वाजवल्या होत्या. असं सगळं खाऊन त्यांना काहीच कसं होत नाही, याचं मला तेव्हा फार आश्चर्य वाटलं होतं. नंतर लक्षात आलं की, ही सारी एक ट्रिक होती, एक हातचलाखी होती. आम्हा मुलांना त्यांच्या तशा ट्रिक्सचं फारच आकर्षण होतं. “आपल्या नेहमीच्या व्यवसायाव्यतिरिक्त अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी हौस म्हणून वसंतकाकांनी केल्या. अनेक गोष्टींची त्यांना आवड होती. त्यांनी एक टूरिंग टॉकीजदेखील काढलं होतं व गावोगावी सिनेमांचे शोज दाखवले होते. एकदा एक सिनेमा बनवायचाही त्यांनी प्रयत्न केला होता. वसंतकाकांची आणखी एक गोष्ट फारशी लोकांना ठाऊक नसेल. ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वापरातल्या सगळ्या मोटारींचे नंबर नेहमी १६०० पासून सुरू व्हायचे! काय त्यांना त्या नंबरचं आकर्षण होतं कोण जाणे!" मीना व दीपक गद्रे यांच्या कन्या शमिका गद्रे-गुणे ह्या नेत्रतज्ज्ञ असून रेटीना हा त्यांच्या विशेष प्रावीण्याचा भाग आहे. आपले दंतविशारद पती अभिजित आणि दोन मुलांसह त्या सन फ्रान्सिस्को बे एरिया, कॅलिफोर्निया, युएसए इथे राहतात. Genentec ह्या एका नेत्रसंशोधन करणाऱ्या प्रख्यात आंतरराष्ट्रीय कंपनीत त्या एक संचालिका आहेत. त्या म्हणतात, “वसंतकाका हे आपले आजोबा आहेत, हे मला त्या मानाने तसं लवकरच उमगलं होतं. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुलामुलींच्या तुलनेत - 'आपण ज्यांना काका म्हणतो ते खरंतर आपले वडील आहेत', हा उलगडा व्हायला त्यांना म्हणे काही वर्षं लागली होती! असो! “वसंतकाकांबरोबरचा माझा सहवास तसा मर्यादितच होता असं म्हणावं लागेल. त्यांच्याबद्दलच्या माझ्या बऱ्याचशा आठवणी ह्या जणू शेजारच्या खोलीतून किंवा पारदर्शक काचेच्या आडून निर्माण झालेल्या आहेत; बऱ्याचशा धूसर म्हणता येतील अशा आहेत. जेव्हापासून माझ्या आठवणी सुरू होतात, त्या अगोदरच त्यांची एक बाजू व वाचा पक्षाघातामुळे कमकुवत झाली होती; त्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी किंवा फिरणं असं फारसं झालंच नाही; पण उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी कुटुंबातले वसंतराव | १६९ ।