Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही व्यवसाय सुरू करायचा आहे का? त्यासाठी मी काही मदत करू शकतो का?" आम्ही सर्वांनी आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा असा त्यांचा आग्रह असे. पुढे राधिका आणि कविता या माझ्या मुली जन्मल्यानंतर 'तुला काही स्वतःचा बिझनेस करायचा असेल, करिअर करायची असेल, तर दोन्ही मुलींना मी कोल्हापूरला घेऊन जातो. तिथे त्या दोघी आरामात वाढतील. तू करिअरमध्ये नीट सेटल झालीस, की त्यांना परत अमेरिकेत आणून सोडू,' अशी ऑफर वसंतकाकांनी मला दिली होती. प्रापंचिक अडचणींत गुंतून पडल्याने मी करिअर करू शकणार नाही, अशी बहुधा त्यांना भीती वाटत असावी. "सुलभाचा मुलगा जयदीप म्हणजे वसंतकाकांचं पहिलं नातवंड त्याच्या आगमनानंतर वसंतकाका अधिक मवाळ झाले असावेत. त्यापूर्वी ते भल्या सकाळी बाहेर पडत आणि रात्री उशिरापर्यंत कामातच गुंतलेले असत. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं होतं. जयदीपनंतर इतरही नातवंडं एकापाठोपाठ एक येत राहिली आणि त्यानंतर नातवंडांमध्ये ते अधिकाधिक रमत गेले. " ( पाचवे अपत्य म्हणजे मीना ही मुलगी. जन्म ८ डिसेंबर १९५१. दीपक गद्रे त्यांचे यजमान. त्यांचे वास्तव्य रत्नागिरीत असते. शमिका आणि अर्जुन ही त्यांची दोन मुले. शमिका अमेरिकेत स्थायिक झालेल्या नेत्रतज्ज्ञ असून अर्जुन वडिलांच्या व्यवसायात आहेत. त्यांच्याविषयी नवव्या प्रकरणात अधिक येणारच आहे. मीनाताई यांचा दीपक गद्रे यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला आहे. गद्रे मूळचे देवरुखचे. अनंत, दामोदर आणि शिवराम गद्रे असे तिघे भाऊ म्हणजे देवरुखचे एक प्रसिद्ध कुटुंब. अनंत यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते व ते समतानंद ह्या उपाधीने प्रसिद्ध होते. दुसरे दोघे घरच्या वडिलोपार्जित व्यापारात होते. त्यांचा कोकणात अडत्याचा व्यापार होता. त्याशिवाय चहाचा व्यापारही ते करत. त्यांची पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची एजन्सीही आहे. दामोदरांचे सर्वांत मोठे चिरंजीव पांडुरंग यांचा दीपक हा मुलगा. शिक्षणासाठी दीपक कोल्हापूरला आले. १९५७ मध्ये तिथल्या प्रसिद्ध सेंट झेविअर शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. इथले माध्यम इंग्रजी होते. पुढे दीपक मुंबईला शिकायला गेले. प्रसिद्ध सिडनम कॉलेजात ते एमकॉम करत होते; पण ते त्यांनी पूर्ण नाही केले. वेगळे काही तरी करायची त्यांना महत्त्वाकांक्षा होती. त्यातूनच ते मासळीच्या कुटुंबातले वसंतराव | १६५ |