गोष्ट अर्थात फक्त त्यांना स्वतःला व ह्या बटलरला ठाऊक असायची. एकदा तो गावाला जाणार होता व त्यासाठी वसंतरावांनी त्याला पंधरा दिवस रजाही दिली होती. तो ज्या दिवशी रजेवर जाणार होता नेमक्या त्याच दिवशी, ते ऑफिसात गेले असताना, ह्या बटलरने ते पैसे चोरले. वसंतरावांना अर्थातच ते त्या वेळी कळले नाही. कारण घरची ती बॅग केवळ अनपेक्षित प्रवासासाठीच राखून ठेवलेली असे व एरवी ती उघडून बघायची काहीच गरज नसे. चार दिवसांनी अचानक त्यांना परगावच्या कुठल्यातरी पोलीस स्टेशनमधून फोन आला. त्यांचे काही पैसे चोरीला गेले आहेत का, अशी पोलिसांनी विचारणा केली. वसंतरावांनी नकार दिला; पण पुढे अधिक चौकशी झाल्यावर सगळे कोडे उलगडले. त्या बटलरकडे असलेले ते चोरीचे पैसे दुसऱ्या कोणातरी चोराने चोरले होते व त्याबद्दल बटलरने पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हा 'तुझ्याकडे एवढे पैसे आलेच कुठून ?” अशी विचारणा साहजिकच पोलिसांनी केली. त्याने दिलेले थातूरमातूर उत्तर पोलिसांना पटेना. त्यासंदर्भात त्यांनी अधिक तपास केल्यावर आपण ते पैसे वसंतरावांच्या बॅगेतून चोरले असल्याचे बटलरने कबूल केले! म्हणून मग पोलिसांनी वसंतरावांना त्याबद्दल फोन करून विचारणा केली होती. पुढे वसंतरावांनी आपली ती प्रवासी बॅग उघडून बघितली तेव्हा सगळा उलगडा झाला! अर्थात असे प्रकार क्वचितच घडत. एरव्ही मनुष्यस्वभावाचा वसंतरावांना आलेला अनुभव तसा चांगलाच होता. वसंतराव आणि प्रमिलाताई यांना दोन मुलगे आणि पाच मुली. त्यांच्या आठवणींतूनही वसंतरावांचे व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे उभे राहते. सर्वांत मोठ्या कन्या म्हणजे सुलभा. जन्म ७ फेब्रुवारी १९४२. ह्या स्वतः डॉक्टर (एमडी, फार्माकोलॉजी) आहेत व त्यांचे यजमान अरुण दाते हे सर्जन (एमएस) आहेत. पुण्यातील कर्वे रोडवरच्या नळ स्टॉपजवळचे प्रसिद्ध लोकमान्य हॉस्पिटल त्यांचेच. आता त्यांचा ज्येष्ठ मुलगा डॉ. जयदीप ते चालवतो. दुसरा मुलगा रणजित रोबोटिक्स ह्या आधुनिक विज्ञान शाखेत अखिल भारतीय पातळीवर नामांकित आहे. त्यांच्याविषयी नवव्या प्रकरणात अधिक आलेच आहे. युरोलॉजीत विशेष प्रावीण्य संपादन करून जयदीप व्यवसायात आल्यानंतर आई-वडलांनी फलटण येथील आपली वडिलोपार्जित शेती करायचा निर्णय घेतला आणि ती उत्तम प्रकारे करून लौकरच भरभराटीला आणली. कुटुंबातले वसंतराव । १५७ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१९१
Appearance