Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घाटगे-पाटील ही जोडगोळी म्हणजे जणू राम-लक्ष्मणाची जोडी मानली जाऊ लागली. खरे तर घाटगे हे ब्राह्मण, तर जयकुमार पाटील हे जैन; महाराष्ट्रातील अनेकांना हे दोघे म्हणजे एकच व्यक्ती आहे आणि ती कोल्हापुरातील एखाद्या प्रख्यात मराठा सरदार घराण्यातील आहे, असेच वाटायचे. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे तशी एकमेकांपासून अगदी भिन्न, पुढे त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्याही; पण त्या फारकतीकडे नकारात्मक दृष्टीने न बघत मुळात त्यांची भागीदारी चाळीस वर्षे टिकली कशी आणि व्यवसायात इतकी यशस्वी झाली कशी, ह्याचेच मला मोठे अप्रूप वाटते. वसंतरावांची अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या जीवनाचा आढावा घेताना प्रकर्षाने जाणवतात. उदाहरणार्थ, शरीरश्रमांची आवड. बॉटनीचा हा प्राध्यापक स्वतः ट्रक चालवत असे. स्वतःच्या हातांनी वेगवेगळी यंत्रे चालवायला शिकणे, वर्कशॉपमध्ये तांत्रिक दुरुस्त्या करणे ह्या त्यांच्या आवडी बुद्धिजीवी भारतीयांच्या बाबतीत तशा अतिशय दुर्मिळ आहेत. ह्याबाबतीत जेआरडी टाटा यांच्याशी असलेले त्यांचे साम्य आश्चर्यकारक आहे. वृत्तीने वसंतराव धार्मिक नव्हते; पण ज्या प्रकारे त्यांनी व्यवसाय केला त्यावरून 'योगः कर्मसु कौशलम्' ह्या गीतावचनाशी असलेली त्यांची बांधिलकी लक्षात येते. त्यांची ज्ञानलालसा, तंत्रज्ञानप्रेम, आपल्या कामातून त्यांनी कमावलेली विश्वासार्हता, त्यांची माणसे जोडण्याची कला, विनम्रता आणि मुख्य म्हणजे 'नेव्हर से डाय' म्हणणारी जिद्द हे सारे गुण पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. वसंतरावांच्या पत्नी प्रमिलाताई ऊर्फ माई यांचाही इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. ह्या चरित्रातल्या बहुतेक सर्व प्रसंगांच्या त्या मूक साक्षीदार होत्या. पती आपले पंख विस्तारून क्षितिजाला गवसणी घालू पाहतो आहे हे जाणवताच, त्यांनी घराचे घरपण राखण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. सावलीप्रमाणे त्यांनी वसंतरावांची सोबत केली. काळाच्या ओघात आज जगभर विस्तारलेल्या घाटगे कुटुंबात जे दुर्मिळ असे प्रेम दिसते, त्याचे मोठे श्रेय माईंना द्यावे लागेल. यशस्वी माणसांना खूपदा हुलकावणी देणारे कौटुंबिक सुख वसंतरावांना भरपूर लाभले ते मुख्यतः माईंमुळेच. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जवळजवळ वर्षभर चाललेले हे लेखन म्हणजे माझ्या दृष्टीने एक आनंदयोग होता. माझ्या कल्पनेपेक्षा खूपच अधिक मी ह्या लेखनात गुंतून गेलो. ज्या कालखंडाचे आपण साक्षीदार नव्हतो त्या कालखंडाविषयी लिहिणे, ज्या व्यक्तीला आपण कधीच भेटलेलो नाही तिच्या आयुष्याचा आढावा घेणे, त्यातील उंचसखल टप्पे लेखनात वसंतवैभव । १७ ।