Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्नेहापलीकडे या सगळ्या लढ्यामध्ये वसंतरावांचा सहभाग होता असे दिसत नाही. राजकारणातही त्यांनी कधी फार रुची दाखवली नाही. पश्चिम महाराष्ट्रात होता त्याप्रमाणे कोल्हापुरात काँग्रेस पक्षाचा जोर कधीच नव्हता. भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखालील 'प्रजा परिषद' कोल्हापुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोरात होती. सत्यशोधक समाजाचा परिषदेवर पगडा होता. बागल यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांना परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेमले. त्यापूर्वी १९४१मध्ये खर्डेकर राजाराम कॉलेजचे प्राचार्य झाले होते. १ एप्रिल १९४९ रोजी कोल्हापूर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. पण तरीही काँग्रेसचा जनाधार कधीच वाढला नाही. १९५२ सालच्या निवडणुकीत काँग्रेस नेते रत्नाप्पाअण्णा कुंभार यांचा पराभव करून खर्डेकर कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड बहुमतानी विजयी झाले; त्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य पंडित नेहरूंना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा थोडेसेच कमी होते. त्याच निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे पाच आमदारही कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आले होते. प्रजा परिषदेचे नेते पुढे शेतकरी कामगार पक्षात सामील झाले. शेतकरी कामगार पक्षाची कोल्हापुरात अनेक वर्षे जणू मक्तेदारीच होती. शे.का. पक्षाची धोरणे कधीच उद्योगक्षेत्राला पोषक नव्हती. कोल्हापूरस्थित ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांच्या मते उद्योगधंद्यांतून राज्याचा विकास व्हावा अशी भूमिका असणारे प्रबळ राजकीय नेतृत्व कोल्हापूरला कधीच लाभू शकले • नाही आणि मुख्यत: त्यामुळे येथील उद्योगक्षेत्र फारसे वाढू शकले नाही. वसंतरावांचे एक स्नेही इचलकरंजीचे यंत्रमाग कारखानदार अनंतराव भिडे यांची १९७७ साली दिल्लीत सत्तेवर आलेल्या जनता सरकारने महाराष्ट्र स्टेट टेक्स्टाईल कॉर्पोरेशन ह्या सरकारी आस्थापनेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती व त्याबद्दल वसंतराव घाटगे यांनी रित्झ हॉटेलमध्ये एक मोठी पार्टी दिली होती. चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, मधु दंडवते वगैरे राजकीय नेते तिला हजर होते. खरेतर त्या पार्टीच्या आयोजनात आबासाहेब कुलकर्णी यांचा विशेष पुढाकार होता. त्या पार्टीची माहिती वसंतरावांच्या एका जुन्या स्नेह्याकडून ऐकायला मिळाली. पण ह्या आठवणी तशा अपवादस्वरूप म्हणता येतील. एरव्ही राजकारणी मंडळींपासून, राजकीय प्रवाहांपासून व त्यातील चढउतारांपासून वसंतराव कायम अलिप्तच होते. व्यवसाय आणि समाज | १३३ ।