आहे. ते पंचवीस वर्षे सातत्याने करीत राहिल्यामुळे घाटगे-पाटील ह्यांच्या व्यवसायात आज अडीच हजार कामगारांना सुमारे साठ लाख रुपये वार्षिक वेतन मिळते. समाजाच्या आर्थिक प्रगतीत ह्या संघटनेने टाकलेली ही भर मी अभिनंदनीय समजतो." औद्योगिक विकासाप्रमाणेच कृषिविकासाच्या क्षेत्रातही हे तितकेच खरे आहे. मागे लिहिल्याप्रमाणे टाफे ही कंपनी कॅनडामधील मॅसे (Massey) फर्ग्युसन कंपनीचे ट्रॅक्टर्स आणि शेतीसाठी उपयुक्त अशी अनेक यांत्रिक अवजारे इंग्लंडहून आयात करत असे. बार पॉइंट प्लाउ, रिव्हर्सिबल प्लाउ, 9 Tine Tiller with seeding attachment यांसारखी त्यांची अवजारे अतिशय दर्जेदार असत. पुढे टाफेनी ती भारतात उत्पादित करायला सुरुवात केली; पण भारतातील शेतकऱ्यांना अशा अवजारांचा काहीच परिचय नव्हता. त्यांना ती विकणे त्यामुळे अतिशय अवघड होते. ट्रॅक्टर कसा चालवायचा ह्याचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवणे आवश्यक होते. मुळातच शेतीतील यांत्रिकीकरण त्या परिसरात नवीनच होते. त्यांना ह्या आधुनिक शेतीची माहिती व्हावी यासाठी टाफेचे एक वितरक म्हणून घाटगे-पाटलांनी खूप प्रयत्न केले. जागोजागी भरवलेले शेतकऱ्यांचे मेळावे हाही त्यातलाच एक उपक्रम होता. टाफे कंपनीतर्फेही त्यांच्या कारखान्यात विक्रेत्यांसाठी खास प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जायची. आपल्या उपकरणांचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा याचे प्रशिक्षण देण्यासाठी राखून ठेवलेले त्यांचे तमिळनाडूत एक २०० एकरांचे शेतही होते. घाटगे-पाटलांचे अनेक कर्मचारी तिथे जाऊन शिकून आले व नंतर आपापल्या विक्रीक्षेत्रात त्यांनी ट्रॅक्टर्सचा व अन्य यांत्रिक अवजारांचा प्रसार केला. त्यासाठी घाटगे-पाटील कंपनीने मराठीतून सचित्र माहितीपत्रके छापली, ट्रॅक्टर्स कसे वापरायचे, त्यातून शेताचा अगदी शेवटचा कोपराही कसा उपयोगात आणता येतो, ट्रॅक्टर्स वापरून शेतीचे उत्पन्न कसे वाढेल, ट्रॅक्टर्सची देखभाल कशी करायची हे सारे दाखवून दिले. शेतकऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यासाठी कंपनीमध्ये खास मराठी स्टेनोग्राफर्स नेमण्यात आले होते. 'यांत्रिक शेती - शेतकरी टाइम्स' नावाचे एक नियतकालिकही खास शेतकऱ्यासाठी कंपनीतर्फे प्रकाशित केले जाई. त्यात आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती असे, शेतीतज्ज्ञांचे लेख असत. व्यवसाय आणि समाज । ११९ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१२१
Appearance