पान:वनस्पतिविचार.pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

आढळते. ह्यामुळे दोन अधिक उंच वाढीच्या मध्यभागी खांचा (pits ) तयार होतात. कधी कधी असल्या सांचेस नळीसारखा आकार येतो. पेशींच्या अंतर बाजूकडील जाडी मळसूत्री, वळ्यासारखी, पट्टेदार वगैरे निरनिराळ्या प्रकारची असते. त्यापासून तयार होणा-या वाहिन्यांचा (Vessels ) आकारही त्याच प्रकारचा होतो.

 वाहिनी ( Vessels ) व पेशीजात (Tissue ) वाहिनीची कल्पना अशी करितां येईल की, डब्यावर डबे ठेवून सारखे रचित जावे, व प्रत्येक डब्याचे झांकण व बुड ही दोन्ही काढून टाकली असतां जो त्यास आकार येतो, तोच आकार वनस्पतींच्या वाहिन्यांस येतो. एकापेक्षा अधिक पेशीं एके ठिकाणी जमून परस्पर संलग्न होतात व त्यांपासून एक विशिष्ट प्रकारचे काम वनस्पतिजीवन यात्रेत घडते. अशा संघास पेशीजाल ( Tissue ) म्हणतात. |

जेव्हां वनस्पति एकपेशीमय असते, त्यावेळेस सर्व जीवनकामें त्या एकट्या पेशीस करावी लागतात. पण बहुपेशीमय वनस्पतींत श्रमविभागाचे तत्त्व पूर्णपणे अमलांत येते, त्या तत्त्वानुसार निरनिराळी कामें निरनिराळ्या पेशीजालास ( Tissues ) करावी लागतात.

 पेशीजाल होण्यांत पेशीसंयोग दोन तीन प्रकारचे आढळतात. कांहीं पेशी एकास एकसारख्या लागून त्यांचा जणू धागा ( Filament ) बनतो. जसे, शैवालतंतु वगैरे. अशा ठिकाणी हा तंतु त्याचे पेशीजाल असते. उच्च वनस्पतिमध्ये तंतुमय पेशीजाल कांही भागांत असते, म्हणजे तंतुमय जाल केवळ क्षुद्रवर्गामध्येच असते असे नाही. तर त्यांचा समावेश दोन्ही वर्गामध्ये कमीअधिक प्रमाणात असतो. कांहीं पेशी बाजूस वाढत गेल्यामुळे, त्यांपासून तयार होणाऱ्या पेशीजालांत दोन्ही लांबी व रुंदी आढळते. पण रुंदी मात्र अगदी कमी असते.

 जेव्हां पेशी तिन्ही दिशेने वाढून पेशीजाले तयार होतात, अशा वेळेस पेशी जालामध्ये लांबी, रुंदी, व जाडी ही तिन्ही येतात. उच्च वर्गातील, तसेच कांहीं क्षुद्र वर्गातील वनस्पतीमध्ये नेहमी आढळणारी पेशीजालें ह्या
प्रकारची असतात,