पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      हिरडा.      ५५

-----

सहा अंगुळे लांब असते. हरीतका त्रिदोषाचा नाश करणारी आहे. जया ही गुल्म व रक्तातिसार यांचा नाश करणारी आहे आणि हैमवती ही बालव्याधींचा नाश करते. अशा प्रकारे हरीतकीच्या निरनिराळ्या प्रकारांचे निरनिराळ्या विकारांवर अनेक उपयोग होतात. हिरड्यांच्या ज्या सात जाती वर सांगितल्या, त्यांपैकी कांहीं जातींचे हिरडे खाल्ल्याने, कित्येकांचा वास घेतल्याने, कित्येकांचा स्पर्श केल्याने आणि कित्येकांच्या दर्शनानेच रेच होतात. मनुष्य, पशु, पक्षी वगैरे कोणताही प्राणी चेतकीच्या छायेखाली गेला, तर त्यास तत्काल रेच होतात. चेतकी जितका वेळपर्यंत हातांत धरावी, तितका वेळपर्यंत रेच झालेच पाहिजेत, असा वैद्यशास्त्रांतील सिद्धांत आहे. नाजूक प्रकृतीच्या व ज्यांची शक्ति क्षीण झाली आहे, अशा लोकांना चेतकीचा रेच सुखावह आहे. हिरड्याच्या मज्जेत मधुर, शिरांत आम्ल, देठांत तिखट, सालींत कडू आणि आठीत तुरट रस असतो. हिरडा चावून खाल्ला तर अग्नि प्रदीप्त करतो. चूर्ण करून खाल्ला तर रेच करणारा होतो. पक्व करून घेतला, तर मलस्तंभक आणि शेकून घेतला तर त्रिदोषनाशक आहे. हिरडा, बेहडा व आवळकाठी या तीन जिनसांना 'त्रिफळा ' असे नांव आहे. व ह्या तिहींच्या चूर्णाला त्रिफला चूर्ण म्हणतात.

  त्रिफला शोथमेहघ्नी नाशयेद्विषमज्वरान् ।
  दीपनी श्लेष्मपित्तघ्नी कुष्ठहंत्री रसायनी ॥
      'शार्ङ्गधर '
 या वरील प्रलोकावरून सुज, मेह, विषमज्वर, कफ, पित्त व कुष्ठ या रोगांचा नाश करून अग्नि प्रदीप्त करणारी त्रिफला ही एक रासायनीच आहे, असे दिसून येते. लहान मुलांना ‘आंकडी' म्हणून जो रोग होतो, त्यावर मोठा हिरडा उगाळून हिरड्यांस लावावा. तेवढ्याने गुण न आल्यास हिरडा, आवळकाठी, व खडीसाखर पाण्यात उगाळून अंजन करावे. सुरवारी हिरडा व खडीसाखर या दोन जिनसा पाण्यात उगाळून डोळ्यांत घातल्यास सर्व प्रकारचे नेत्ररोग बरे होतात. अशाप्रकारचे हिरड्याचे अनेक औषधि उपयोग वैद्यकशास्त्रांत सांगितले आहेत. असो, आता आपण व्यापारसंबंधी उपयोगांकडे वळू.

 हिरडीच्या कोवळ्या पानांना एक जातीचे किडे आहेत, ते टोंचून भोंके पाडतात व त्या ठिकाणी आपली अंडी घालतात. या अंड्यांभोंवतीं पानांतील रस जमून त्याचे मोठमोठे फोड बनतात, त्यांची उत्तम शाई होते. त्यांत तुरटी मिसळल्याने त्या मिश्रणाचा चांगला टिकाऊ पिवळा रंग होतो, परंतु अशा प्रकारचे फोड आपल्या इकडच्या भागांतील झाडांच्या पानांवर फारसे आढळून येत नाहीत. आपल्या इकडे हिरडीच्या फळांचा म्हणजे हिरड्याचाच रंग देण्यास व कातडी कमावण्यास फारच मोठा