पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


फ्रान्समधील अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन


 बालकल्याणाची गंगोत्री मानल्या जाणा-या युरोपबद्दल, तेथील बालकल्याणकारी संस्था, कार्यपद्धती, समृद्ध बद्दल अनेकदा वाचले ऐकले होते. कदाचित त्यामुळेच असेल, मनात हे सर्व एकदा पहावे असे वाटत होते. पण त्याचा योग इतक्या लवकर येईल असे मात्र कधी वाटले नव्हते. पुण्याच्या असोसिएशन ऑफ दि फ्रेंड्स ऑफ फ्रान्स या संस्थेच्या निर्मलाताई पुरंदरे, राजाभाऊ पटवर्धन, रमाकांत तांबोळी इत्यादींनी प्रेरणा नि प्रोत्साहन दिले नसते तर कदाचित ही इच्छा सुप्तच राहिली असती. त्यांनी निवड केल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, हितचिंतक मंडळींनी अर्थबळ दिले नि त्यामुळे फ्रान्स, स्विट्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, इंग्लंड, लक्झेंबर्ग इत्यादी देश पाहता आले. या देशाच्या अभ्यास दौ-याने बालकल्याणकारी कार्याकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली.
 युरोपच्या दौ-यावर जाण्यापूर्वी मी मनात ठरवले होते की तेथील संस्था पाहून यायच्या व आपल्या संस्थात तेथील आदर्श उतरवायचा. तेथून येऊन आणखी एखादी संस्था सुरू करायचेही डोक्यात होते. पण इंग्लंडच्या दौ-यात लक्षात आले की तिथे समाज इतका प्रगल्भ झाला आहे की अनाथांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी समाजात ‘संस्था' नामक कृत्रिम व्यवस्था असावी हे तत्त्व नि व्यवहार दोन्ही पातळीवर तेथील समाजास मान्यच नाही नि म्हणून एके काळी तिथे असलेल्या अनाथाश्रम, अर्भकालय, बालसुधारगृह इत्यादी संस्था आता इतिहासजमा झाल्यात. बालकल्याणाचा हा आदर्श आपल्या देशातील सद्य:स्थिती पाहता अशक्यप्राय नसला, तरी सहजसाध्य खचितच नाही. सद्य:स्थितीत हे शिवधनुष्य आपण उचलू शकणार नाही इतकेच. त्यामुळे प्रगती व विकासाच्या प्रवाहात एकच पर्याय उरतो, तो हा की विद्यमान संस्था भौतिक नि भावनिकदृष्ट्या समृद्ध करणे. त्या दृष्टीने फ्रान्समध्ये चालू असलेले अनाथ, निराधार, बालकांचे संगोपन व पुनर्वसनविषयक कार्य

वंचित विकास जग आणि आपण/१००