पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३२ : शतपत्रे


भटाचा विद्येचा निरुपयोग

पत्र नंबर ७१ : १२ आगष्ट १८४९

 पूर्वी एका पत्रात सांप्रत काळचे ब्राह्मणाचे स्थितीविषयी लिहिले होते. त्याचा जबाब पुण्यातील 'ज्ञानप्रकाश' पत्रात नंबर २२ यात एका 'यथार्तवादी'ने दिला आहे.
 त्यात त्याने आमचे सहा निश्चय कबूल केले आहेत. (एक) ब्राह्मण अज्ञान; (दुसरा) अर्थ समजल्यावाचून ते जप वगैरे करतात, हे ठीक नाही; (तिसरे) देवाविषयी त्यांस काही कळत नाही; (चौथे) मनुष्यांनी कसे वागावे हे समजत नाही; (पाचवे) हल्लीचे ब्राह्मण हे कनिष्ठ जातीपेक्षा चांगले नाहीत व (सहावे) ते गर्विष्ठ फार. या निश्चयांचे त्याने उत्तर दिले आहे; परंतु त्याचे उत्तरात काही अर्थ दिसत नाही. त्याने केवल भटासारखे लिहिले आहे. शेवटी आपण म्हणतो की, हल्लीचा मूर्खपणा ब्राह्मण सोडतील तर बरे होईल ! अस्तु.
 याचा भाव पहिले उत्तरात असा आहे की, मला सर्व ब्राह्मणांची हकीकत कशी समजली? याचे प्रतिउत्तर असे आहे की, सर्व ब्राह्मणांची हकीकत समजावयास काय अवघड आहे ? ब्राह्मण अज्ञानी किती आहेत, याचे वर्णन मी किती करावे ? भटात व अतिक्षुद्रांत मला इतकेच अंतर दिसते की, एक बोलता राघू व एक न बोलता राघू, परंतु ज्ञान एकच. ब्राह्मण वेद वगैरे पाठ म्हणतात; परंतु अर्थज्ञतेविषयी उभयतांची योग्यता समान आहे. अतिशूद्र गरीब, ते आपला लहानपणा जाणतात; परंतु भट मूर्ख असून ज्ञानी समजतात व गर्व करतात, हा एक त्यामध्ये दुर्गुण अधिक आहे. हे ज्याचे मनास ठसावयास हवे असेल, त्याने वेदाच्या शाळेकडे पहावे. तेथे मुले शिकतात काय ? व देवाविषयी व आपले धर्माविषयी विचार करतात किंवा फक्त राघूसारखे पाठ करीत बसतात.
 भटांनी लोकांस किती वेडे लाविली आहेत ? व किती गैरसमजुती पाडल्या आहेत, त्याचा अंत नाही. ब्राह्मणभोजनादिक हा धर्म समजतात; परंतु निरुद्योगी माणूस भीक मागावयाचा व्यापार करतात आणि भिक्षेचा उपयोग काही करीत नाहीत; विद्या वाढवीत नाहीत; अर्थेकरून अंतःकरण पवित्र करीत नाहीत; जिव्हेचा उपयोग मनास एकीकडे ठेवून करतात. त्यांस धर्म केला असता पुण्य कशाचे आहे ? जसे पात्रावर मिठापासून भातापर्यंत वाढलेले असते, त्याचप्रमाणे मनुष्यास मनापासून इंद्रियांपर्यंत ईश्वराने वाढून दिले आहे. त्यात मन हे उत्तम भाताप्रमाणे; त्याचा धिक्कार करून लवणच जे भक्षितात, त्यांस किती मूर्ख