पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २२९

नाही. असे अक्षरशत्रू आहेत. या लोकांस वाचणे ठाऊक नाही. पाठ करणे ठाऊक आहे. 'प्रातःस्मरामि' पाठ करतात. देवपूजा पाठ करतात. भट तर दशग्रंथ पाठ करतात व कित्येक मूर्ख 'जटापाठी' आहेत, म्हणजे मागेपुढे, उलटीसुलटी अक्षरे पाठ करतात. याचा उपयोग काय ?
 पण या ब्राह्मणांचा केवढा मान लोक करतात ? घनपाठी बुवांस शालजोडी द्या, रुपये द्या आणि मूर्खपणा वाढवा. कित्येक जुन्या ठशाचे लोक शंख करतात की, वेदविद्या बुडाली. पण महाराज, ही विद्या हवी कुणाला ? पाठ करावयाची मजुरी कशास ? अर्थासहित दोन अध्याय का म्हणा ना ? त्यातील ज्ञान समजून घ्या. म्हणजे दोन अध्याय अध्ययन घनपाठी टोणप्यापेक्षा बरे. पाठ करावयाची ही विद्या कोणत्याही देशात नाही. ,क एक अक्षर मागे-पुढे, उलटे-सुलटे पाठ केले, म्हणजे काही दूध निघते की काय ? सार्थ वेद म्हणावा. मग तो किती का होईना ? दशग्रंथी म्हणून मिरवतात कशाला ? हे तर मला बैल असे वाटतात. याचकरिता मी प्रार्थना करतो की, हा मूर्खपणा सोडून वाटेवर यावे.

♦ ♦


अर्थावाचून पाठ करणे

पत्र नंबर ६३ : १० जून १८४९

 मला वाटते की, ब्राह्मण लोकांनी आता अर्थावर चित्त द्यावे. केवळ पाठ म्हणणे यात काही फळ नाही. पाठ म्हणावे, अशी आज्ञा शास्त्रात आहे, तिचा अर्थ तसा घेऊ नये. ते उगीच लोकांची भक्ती बसण्याकरिता लिहिले आहे. त्यात काही उपयोग किंवा वास्तविकपणा नाही. हे त्यांनी मनात आणावे. ब्राह्मण लोक मूर्ख, म्हणून अर्थाचा अनर्थ करतात. खरा अर्थ समजत नाहीत. जे लिहिले आहे, तसेच तर्क केल्यावाचून भलतेच समजतात. याजमुळे शेकडो गृहस्थ रोज गीता, विष्णुसहस्रनाम वाचतात. हा मूर्खपणा आहे की नाही बरे ? मला वाटते की, असे फक्त पाठ करणारे यांस काही कळत नाही आणि ब्राह्मण लोक सरासरी कामावर नेमले, तर मग त्यांचे ऐश्वर्यानुरूप स्नानसंध्या वाढते. ती कोणती म्हणाल तर एकादष्णी म्हणजे पाणी देवावर ओतावे, तुळशीची झाडे लावावी. तुळशीसहस्रनामे इत्यादिक पूजा वाढवून वेळ खर्च करावा व