पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४८ : शतपत्रे

घडावयाचे नाही. आणि इतकाच भेद स्वर्गास व मृत्युलोकास आहे. येथे भ्रांती आहे म्हणून दुःख आणि तेथे भ्रांती नाही व ज्ञान आहे, म्हणून सुख. असो.
 परंतु ईश्वर संकेताने झाले ते कोणाच्याने फिरवत नाही. याजकरिता ईश्वराने अक्कल दिली आहे. त्या अकलेच्या जोराने मनुष्याने एकमेकांचा बुद्धिबळे करुन ज्ञानाचा पाठलाग करावा. म्हणजे त्याचे पोटी सुख आहे, गोष्ट सिद्ध आहे. परंतु पूर्वी सांगितले की, मनुष्यास प्रसंग आल्याखेरीज त्याचे गुण दृष्टीस पडत नाहीत आणि प्रसंग दैववशात् कोणास मिळतात व कोणास मिळत नाहीत. तेव्हा जगाचे आरंभी जेव्हा लोकांची वृद्धी होत चालली होती, तेव्हा हे प्रसंग वाढत चालले. एकाची संपत्ति पाहून दुसऱ्यास लोभ झाला व त्याने ती दिली नाही; म्हणजे त्यांस राग यावा. एकाने एक जमिनीचा तुकडा घेतला व तो नीट केला. त्याजवर दुसरा उगाच दावा करू लागला, म्हणजे त्या उभयतांचे भांडण व्हावे. तसेच एक सुंदर स्त्री झाली, तिचे एकाने परिग्रहण केले व तिच्यावर दुसऱ्याने नजर ठेवली. तेव्हा एक म्हणू लागला की, ही माझी स्त्री. हिचे मी परिपालन केले आणि आता हिला हा कोण नेणार ? तेव्हा अर्थातच कज्जा झाला. अशाच स्थितीत काही काळपर्यंत लोक समाईक होते.
 पाहिजे ती जमीन घ्यावी. पाहिजे त्याने स्त्री घ्यावी. धर्म मुळी काही नसेल आणि असण्याची त्या काळी गरज नव्हती. कारण जोपर्यंत दुसऱ्यास दुःख होत नाही, तोपर्यंत पाप नाही. आणि स्वर्गास इच्छित पदार्थ प्राप्त आहेत. तेथे कोणी माझी अप्सरा म्हणत नाही, पाहिजे तेथे राहतात व पाहिजे त्याचा स्वइच्छ उपभोग करतात; परंतु अज्ञान आणि भ्रांती मृत्युलोकांत फार. येथे चालेना व लोकांत कलह फार उत्पन्न होऊ लागले.
 तेव्हा जे लोक होते, त्यांतील जो प्रमुख बळवान होता, त्याने नेम करून दिले की, जी जमीन ज्याने घेतली, तीच त्याने वहिवाटावी; दुसऱ्याची घेऊ नये. तसेच जाणे जी स्त्री वरिली ती त्याची झाली. तिजवर कोणी दावा करील, तर त्यांस शासन होईल. तसे स्त्री जाणे वरिली, त्याने परस्त्रीचा लोभ करू नये. कारण तेणेकरून त्याचे स्वस्त्रीस दुःख होते. आणि असे ठरले की, ज्याने स्त्री केली. त्याने तिचे पालन करावे. आणि तिला पुत्र होतील ते त्याचे वारीस समजावे. असे परस्परांचे दुःख टाळण्याकरिता अनेक नियम केले.
 तेव्हा लोकांत पद्धत पडली आणि जो बळकट होता, तोच त्यांचा राजा झाला. त्याचे आज्ञेत इतर लोक राहू लागले; परंतु पहिल्याने लोक भाषा बोलू लागले, ह्या वेळेसच ते अक्षरे लिहू लागले नसतील; कारण भाषेच्या मागील हे प्रकरण आहे. पहिल्याने लोक एकमेकांस निरोप सांगून पाठवीत