पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १२५

आचार्यबुवा, भटजीबुवा म्हणवितात. परंतु ही सर्व ढोंगे आहेत हे लोक जाणत नाहीत. आणि त्यांचे नादी लागून त्यांस पैसा देतात. परंतु स्वतः विचार पहात नाहीत. बरे-वाईट दुसऱ्याने दाखविले तरी पहात नाहीत. त्यांस मूर्ख म्हणून त्याची फजिती करतात.
 अलीकडे नवे ग्रंथ बहुत झाले आहेत. रसायनशास्त्र, यंत्रज्ञान, शिल्प इत्यादिक. परंतु त्यांतील गोष्ट कोणी एकही पहात नाही व लोकांचे स्वभाव असे विलक्षण आहेत की पुढारी होईल त्यांस पाडाव करतात. त्याचे रक्षण कोणी करीत नाही. त्याचा एकत्रपणा मुळीच नाही. जर त्यांस लग्नास, मुंजीस वगैरे बोलाविले तर पाच हजार लोक येऊन चार घटिका उगेच बसतात; परंतु अमुक विचार करावयाचा आहे तेथे या म्हणून बोलाविले तर येणार नाहीत; व आले तरी त्यांस बोलता येणार नाही. त्यांच्याने विचार करवत नाही. त्यांची चित्ते विचाराकडे नाहीत. मागील चाल पडली आहे, म्हणून लग्नास वगैरे तरी जमतात. परंतु चालीविरुद्ध अमुक एक तळे नीट करावयाचे आहे, त्यांस पट्टी करण्यास बोलाविले. तर कदापि येत नाहीत.
 बरे, हे पैसा देण्याचे काम आहे, म्हणून असो. परंतु लोक दारू पितात, त्यांचा बंदोबस्त कोणत्या रीतीने करावा. याजकरिता फुकट बोलाविले तरीही बहुत करून जमणार नाहीत व शास्त्री, पंडित त्यात असले तर एकही गोष्ट सिद्धीस जावयाची नाही. कोणी कुतर्क करील. दुसरा पंडित बोलला म्हणजे त्यांस उगेच उत्तर करावे, म्हणजे श्रेष्ठत्व झाले, भलतेच बोलतात या प्रकारची यांची व्यवस्था आहे. मग मोठाले विचार करणार कोठून ? यांस माहितगारी नाही. बरे, जे दुसरे सांगतात ते तरी ऐकावे; तेही करीत नाहीत. ग्रहण चंद्राच्या छायेने पडते, हे कदापि खरे मानीत नाहीत. व त्याचा पुरावा पहात नाहीत. पुराणातील वेड मनात भरलेले असते, ते जातच नाही. या प्रकारचे लोक मूर्ख आहेत, आणि सरकारास मदत करणारे लोक पारशी मात्र आहेत. त्यामध्येच मात्र काही सुधारणा झाल्या आहेत.
 ग्रंथाचे तर्जुमे स्वभाषेत करावे, त्यांस पैसा द्यावा, गरिबांकरिता धर्मशाळा कराव्या व गरिबांकरिता औषधपाणी देण्याकरिता वैद्यखाने, दवाखाने करावे, ही धर्मकृत्ये आहेत असे ते जाणतात. व सरकारने एकाही एक कामात पैसा दिला, तर आपण बाकीचा देऊन सरकारचा मनोदय पुरता करीतात. व लग्नकार्यास पैसा उडवीत नाहीत. ज्याचे घरी लग्न होईल, तो पन्नास रुपये धर्म करावयाचा तो कारखान्यास देतो. जर ब्राह्मणांमध्ये ही गोष्ट कोणी पुढे काढील आणि लग्नप्रयोजनातील दक्षणा बंद करील, तर ब्राह्मणांचे मोठे शत्रुत्व होईल. त्यांस