पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १२३

काय हेही समजत नाही व कोणी वाचीत नाहीत व विकतही घेत नाहीत. जर कोणी म्हटले की, मी ग्रंथ करण्यावर पोट भरीन, तर त्यांस काही मिळावयाचे नाही; व कोणी शास्त्री, पंडित, भटे जरी मूर्खशिरोमणि असली, तरी त्यांस लोक चार रुपये देतील; परंतु ग्रंथकर्ता, वर्तमानपत्र छापणारा व छापखाना घालणारा विचारशीलही असला, तरी त्यांस कोणी पैसा देणार नाहीत व त्याचा माल अगदी घेणार नाहीत. शिवाय त्यांस मूर्ख म्हणतील. हाच काय शहाणा ? जनावरांची वर्णने व इतर देशांची वर्णने यात काय आहे ? असे उपहास करतील.
 केवढे आश्चर्य आहे की, या लोकांस इतकी भ्रांत अजून आहे ? ग्रंथ करणाऱ्यास खप नाही. ग्रंथ करून त्यांस विकत घेणारे मिळविणे म्हणजे मोठा प्रयत्न पडतो. जुलुमाने व भिडेने ते लोकांचे गळी बांधावे लागतात, त्याजबद्दल किंमत देणे म्हणजे लोकांस असे वाटते की, हा पैसा व्यर्थ आहे. यात पुण्य नाही व धर्मही नाही. वैदिक ब्राह्मणाचे घरी जात नाही, हा धर्म कशाचा ? हे व्रत नाही, दान नाही. तेव्हा ग्रंथ घेण्यास पैसा कशाचा द्यावा ? याप्रमाणे हे लोक दुर्भाग्य आहेत. याचा काळ विपरीत, म्हणून यांस अशी बुद्धी झाली आहे, हे तर उघड आहे.
 परंतु लोक असे समजतील तर बरे- ग्रंथ छापणारे यांस पैसा द्यावा हे सर्वांपेक्षा उत्तम आहे व या देशांत तर अति उत्कृष्ट हाच धर्म आहे. हे मूर्खास शहाणे करण्याचे काम आहे; म्हणून हाच धर्म सर्वांहून श्रेष्ठ आहे. अशी समजूत यांची पडेल तर त्वरित लोक सुधारतील, यात संशय नाही. व असे झाल्यावाचून ग्रंथही पुष्कळ होणार नाहीत; परंतु ईश्वरी इच्छा प्रमाण.

♦ ♦


अभिमान

पत्र नंबर ९५

 एका पत्रात सरकारास मदत मिळत नाही, म्हणून लोकांच्या वेडेपणाचा स्वभाव वर्णन केला; परंतु आणखीही लिहितो की, आमचे लोक सरकारास मदत कोठून देणार? आमच्या पैकी एक शहाणा होऊन पुढारी झाला, तर त्याणे जे काही सांगितले, ते देखील ऐकावयाचे नाहीत. व त्यांस शहाणा