पान:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की, सरकारकडून तुम्हाला आलेल्या पत्राची एक प्रत तुम्ही मजकडे पाठवा. मी त्यावर लेखी खुलासाच तुम्हाकडे पाठवीन तो तुम्ही सरकाराकडे पाठवावा हे बरे. पण लँँबसाहेबांचा मी पिच्छा सोडला नाही. लगेच मी त्यांना एक पत्र लिहिले व त्याबरोबर एक मसुदा पाठविला. त्यात समक्ष भेटीत त्यांचे माझे जे बोलणे झाले त्याचा सारांश लिहून काढला होता. मी तो प्रसिद्ध करण्याची त्यांना परवानगी मागितली. कारण असे दाखविले की," तुम्ही आम्हाला भेटीला बोलाविता ती गोष्ट बरीच आहे. कारण पुष्कळ गोष्टींचा परस्पर खुलासा समक्षच होतो. पण तुम्ही पडला मैजिस्ट्रेट. आम्ही पडलो संपादक. तुम्ही आम्हाला भेटीला बोलाविले असे बाहेर कळल्याने तुमच्याविषयी काहीच गैरसमज होण्यासारखा नाही. पण आमच्याविषयी मात्र तर्कवितर्क सुरू होतात. कोणी म्हणतो यांना मॅजिस्ट्रेटाने तंबी दिली! कोणी म्हणतो मॅजिस्ट्रेटाजवळ काही कबुल्या देऊन आले! तेव्हा उत्तम मार्ग म्हटला म्हणजे तुमचे आमचे झालेले भाषण सारांशरूपाने प्रसिद्ध व्हावे. तुम्ही होऊन ते करणार नाहीच पण आम्ही करू. कारण आम्हाला त्याची गरज. भाषणाचा सारांश प्रसिद्धच करणार त्याअर्थी त्यात न घडलेली गोष्ट किंवा न बोललेले शब्द अर्थातच मी लिहिणार नाही. पण साराश छापल्यानंतर तुम्ही तो वाचावा त्यापेक्षा तो छापण्यापूर्वी तुम्हाला दाखवावा हे अधिक योग्य. म्हणून मी तो तुमच्याकडे आगाऊ पाठवीत आहे. तरी काही चूकबिक असली, तर दुरुस्त करून कागद मजकडे परत पाठवावे.' लँबसाहेबांच्या व माझ्या संभाषणात रागाची अशी बरीच उत्तरे प्रत्युतरे झाली होती. ती प्रसिद्ध करण्याला माझी तयार होती पण लँँबसाहेबांची नव्हती यात त्यांच्याकडे सहजच कमीपणा येत होता. याचा मी पुरा फायदा घेतला. भाषणातील एक मुद्दा असाही होता की, प्लेगच्या व्यवस्थेत ज्या सवलती एका गावी लोकांना मिळत नाहीत त्या दुसऱ्या गावी लोकांनी दंगेधोपे केले असता त्याना मात्र मिळतात. 'मराठा' पत्रात मी हे विधान उघड केले होते. त्यावर सरकारचे म्हणणे असे की, "आम्ही सवलती देतो त्या कोणाच्या दंग्याधोप्याला भिऊन देत नाही. आम्हाला त्या योग्य वाटतात म्हणूनच देतो." या विधानासंबंधाने आमच्या संभाषणात बरीच चर्चा झाली. त्या चर्चेत लँँबसाहेबांचा युक्तिवाद लटपटीत व भाषण फुकट गुर्मीचे, आणि उलट माझा युक्तिवाद भरीव, भाषणही जोराचे असे असल्यामुळे, लँँबसाहेब ते प्रसिद्ध करू इच्छित नव्हते हे उघड झाले. म्हणून या विषयावर मराठयात एक स्वतंत्र अग्रलेखच ‘The Editor The and Magistrate' या नावाखाली मी घातला, व त्यात खालीलप्रमाणे स्पष्ट लिहिले. "संभाषणप्रसिद्धीला जर बंदी, तर मला भेटायला यांनी बोलवावेच का? त्यांचे म्हणणे त्यांंना पत्राने मला कळविता आले नसते

४८/ महापर्व