________________
प्रस्तावना आज विजयादशमीस (ता. १८ ऑक्टोबर सन १९४२ ) मी या माझ्या लघुकथा-चतुष्टय पुस्तकाच्या दुसऱ्या भागाची प्रस्तावना लिहिण्यास पेन हातीं घेत आहे. माझ्या पहिल्या अर्थशास्त्राची मूलतत्त्वें या पुस्तकाची प्रस्तावना मी विजयादशमीस (ता. १० ऑक्टोबर सन १९१० ) लिहिली होती. माझ्या वयाच्या चाळिसाव्या वर्षापासून आज बहात्तराव्या वर्षांपर्यंत म्हणजे बत्तीस वर्षे माझा वाङ्मय व्यवसाय ज्या परमेश्वर कृपा- प्रसादाने चालू शकला त्याला स्मरून या माझ्या पंचविसाच्या पुस्तकास प्रस्तावनारूपी चार शब्द लिहिण्यांत मला आनंद वाटत आहे. या कथा शेक्सपियरच्या नाटकांच्या आधारे लिहिलेल्या लँब्स टेल्सच्या धर्तीवर लिहिल्या असून, त्या तीन भागांत प्रसिद्ध करण्यांत येणार आहेत. या तीन भागांमिळून स्कॉटच्या बारा विशेष वाखाणलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यां- च्या आधारावर स्वतंत्र कथा मी मराठीत लिहून प्रसिद्ध करीत आहे. त्या कथा मुळाइतक्या — निदान त्यांच्या खालोखाल - मनोरंजन करणाऱ्या, माहिती देणाऱ्या व उच्च मनोभावना उद्भविणाऱ्या होतील अशी मला आशा आहे. या भागांतील पहिली कथा फ्रान्सच्या अकराव्या लुईच्या कारकीर्दीतील तीन आठवड्यांच्या अवर्धीत घडलेल्या प्रसंगावर आधारलेली आहे. ज्या- प्रमाणे इंग्लंडच्या सातव्या हेन्री राजानें सरदारांचे सामर्थ्य खच्ची करून त्यांना राजनिष्ठ सेवक बनवून मध्यवर्ती राजसत्ता बळकट व वैभवशाली केली त्याप्रमाणे लुई राजाने आपल्या दीर्घ कारकीर्दीत फ्रान्सची राजसत्ताही सामर्थ्यवान् व वर्धनशील केली. लुई राजाचा दूरदर्शी धोरणीपणा, मोठी मुत्सद्देगिरी व फलज्योतिषावरील भोळसर भक्ति व चार्ल्स ड्यूकचा रागीटपणा, उतावळेपणा व अविचारीपणा या परस्परविरोधी स्वभावाचें उठावदार चित्र या लघुकथेंत आलें आहे. दुसरी लघुकथा दुःखपर्यवसायी किंवा दुःखान्त आहे. तिचे संविधानक शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलियट नाटकाच्या संविधानकासारखे