Jump to content

पान:लक्ष उर्मी (Laksh Urmi).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असल्याने त्यांचे नाव विजयच ठेवले गेले. अशातच अण्णांची बदली मंगळवेढ्याला झाली. मी सकाळी किंवा संध्याकाळी बाळाचे कपडे धुवायच्या निमित्ताने ओढ्यात जाई. एकूणच ओढ्याचे मला फार आकर्षण होते. गावाच्या भोवती ओढा असल्याने शाळेतून पुन्हा १० मिनिटाच्या सुट्टीतसुद्धा मी ओढ्याला भेटून यायची. पण माझ्या या सुंदर बालपणाला कुणाची दृष्ट लागली? | आण्णा रिटायर झाले. आम्हाला माझं आवडतं कवठेमहांकाळ, शाळा, शाखा, मैत्रिणी व मुख्य म्हणजे ओढा हे सर्व सोडून जावं लागलं. इथं आणखी एक छान गोष्ट घडली. अर्थात आण्णांना पण रिटायर होणार हे माहित असणार. इथंचं राजा व बापूची खूप थाटात मुंज झाली. दवाखान्यावर टुमदार अष्टकोनी मोठा हॉल होता. तिथं मुंज व जेवण. खाली घराजवळ अंगणात तट्टी बांधून स्वयंपाक केला होता व त्यावेळी मामीने मला स्वतःच्या हातांनी आभाळी रंगाचा जरीचे काठ लावून परकर झंपर शिवला होता. तो मला इतका आवडला होता की, तो घालून मी मुंजीच्यावेळी खूप मिरवले. विजयचे बारसे सुद्धा थाटातच झाले होते. आण्णांच्याकडे पैसा फार नव्हता. पण हौस व उत्साह फार. म्हणतात ना हौसेला मोल नाही. पण आण्णांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही. मामी पण कोंड्याचा मांडा करून संसार करणारी. मग आम्ही मुलं आनंदातच वाढणार ना ! आम्हाला एकमेकांबद्दल खूप माया होती. एकदा शरद हरवला म्हणून मी खूप रडले. अर्थात सगळेच रडत होते. तर हा गावात, जंगलात हुडकून आल्यावर घरातल्या हॉलमध्ये कोपऱ्यात गाढ झोपलेला व त्याच्यावर कुणीतरी बरीच दुपटी वगैरे टाकलेली. तेव्हा काका-काकू घरात होते. काकू बाळंतीण, तिला दुपटं हवं म्हणून घ्यायला कपडे काढते तर शरद जोरात घोरात होता. असे मजेत चाललेले दिवस. पण आण्णा रिटायर झाल्याने | आम्हाला कवठेमहांकाळ सोडावे लागले व आम्ही मुडलगीस आलो. पूर्ण कानडी गाव. मला सांगली, कवठे वगैरे मराठी गांव व मराठी शाळेची सवय, घरात फक्त आण्णा, मामी व राजा बरोबर कानडी. बाकी आम्ही बापू, लीला सर्व मराठी बोलायचो. मुडलगीला आल्यावर बापूला शाळेत घातलं. मला पण शाळेत घातलं. पण शाळेत मी जाईचना. मला अक्षर काढणे जमेना व मुख्य शाळा आवडेना कारण मारुतीच्या देवळाच्या व्हरांड्यात शाळा भरायची. तिथं खूप | धुरळा असायचा व फ्रॉक घाण व्हायचा. मी शाळेला जाणे बंद केले. घरातच बसायची. मामीला मदत करायची व दुपारच्या वेळी कुंटभिमाक्का म्हणून मैत्रीण होती तिच्याकडे जायची. तिचे आजोबा घरातच पुस्तकं विकण्याचा बिझनेस करायचे. ती लंगडी होती म्हणून तिला कुंट भिमाक्का म्हणायचे. मला खूप वाईट वाटायचे. मग मी तिला नुसतचं भिमाक्का म्हणायची. तिचं छोटसं घर मला खूप आवडायचं. त्याला कारण पुस्तकं. तिचे आजोबा मराठी शिकले होते व ते मराठी पुस्तकं पण आणायचे व मला वाचायला दयायचे व माझ्यावर खूप प्रेम करायचे. पूर्वी बिन्नी म्हणून एक क्लास असायचा. त्या वर्गातच अक्षर, बाराखड्या व पाढे शिकवत व मग पहिली. मी तर दुसरीत होते. त्यामुळे मला चांगले वाचता येत होते व वाचायच्या नादाने व पुस्तकाच्या आवडीने शाळेत जात नसले तरी मला ज्ञान मिळत होते. ते आजोबा माझा अभ्यासही घ्यायचे. कारण ते पूर्वी शिक्षक होते. असेच कंटाळवाणे पण त्यातच समाधान मानत दिवस जात होते. आण्णांनी इथं पॅक्टीस सुरू केली. ते परत स्वतःच्या दवाखान्यात रमू लागले. पण आण्णांना माझे घरी बसणे व बापूचे शिक्षणही बरे होईल का याची चिंता सतावत असणार. त्यामुळे आम्हा सर्वांचे एकूणच हाल होवू लागले. महायुद्ध संपलं असलं तरी त्याच्या महागाईच्या झळा संपल्या नव्हत्या. त्यात खेड्यात त्याची जास्त जाणीव होऊ लागली. लाल रॉकेल, साखर नाही त्यामुळे गुळाचा चहा व जेवणात कण्या, दूध दभतं कमी व त्यात घरात माणसं राजा, बापू, लीला, शरद, विजय, काका, काकू, आण्णा, मामी. काका काही मिळवत नव्हते. (त्यांची मुलगी बाळी) त्यामुळे आपल्या मुलांचे हाल होवू नयेत व शिक्षणही व्यवस्थित व्हावे म्हणून जवळच असलेल्या तेरदळ या तालुक्याच्या गावी दोन खोल्या, अंगण व ब्राह्मण वस्ती असलेल्या ठिकाणी वेगळे ठेवले व तिथल्या शाळेत आमची नावे घातली. शाळा पण मराठी होती. इंदू व मामा पण तिथचं रहात होते (वेगळे) मामा कोर्टात नाझर होते. घर पण छान होते.शाळा तितकीशी आठवत नाही पण शाळा मोठी होती. मी च बापू शाळेत जावू लागलो. लीला पण कधी कधी यायची. शरद विजय घरात . विजय एक किंवा दीड वर्षाचा असेल पण चालत होता. (भिंत धरून) मला वाटतं याच सुमारास आंबूला मुलगी झाली शोभा, पहिला प्रकाश. मग तिची सारखी पत्रे आण्णांना येऊ लागली व आण्णांनी मी घरात बसते हे कळलेलं असणार. कवठ्यात असतानाच त्यांचे येणे जाणे चालू झाले होते. डॉक्टर हेरेकरांनी मध्यस्ती करून राग शांत केला होता. त्यामुळे त्या इयत्तेतील परीक्षा संपल्यावर मला बेळगावला पाठवले. मी शाळेत जात नव्हते. तेव्हाच स्वातंत्र्य मिळाले होते. आमचे बि-हाड बहुतेक मध्येच म्हणजे दिवाळी नंतर केले असावे. झाले ऽऽ मी परत बेळगावला, ६