Jump to content

पान:लक्ष उर्मी (Laksh Urmi).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत प्रस्तावना मला २९ मे २००९ ला ७४ वर्ष सुरू झाले. त्यादिवशीव बाळूनी मला नोटबुक दिलं. पण एक महिना बरे नसल्याने मी काहीच लिह शकले नाही. खरं म्हणजे मला पेन व बुक बाळूनी का दिलं असेल ? मला लिहिण्याची सवय आहे हे त्याला माहीत नाही. मला संजूने पण ७-८ वर्षांपूर्वी अशीच छान वही व पेन दिलं आहे. त्यात मी बरंच पण थोडं थोडं लिहिलं आहे. पण त्यावेळी मला बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. त्या पार पाडता पाडता जास्त वेळ मिळाला नाही म्हणण्यापेक्षा मानसिक तयारी व समाधान कमी होतं. ___आता मात्र मी पूर्ण समाधानी आहे व पुढच्या वयात लिहावं म्हटलं तरी आठवेल की नाही ? व आठवले तरी बसून लिहिणं होईल की नाही असे वाटले व आज आषाढी एकादशीच्या मुहूर्ताने लिहायला सुरुवात केली. मी काही हे जगाला सांगायला किंवा मुलांना व नातेवाईकांना समजण्यासाठी लिहित नसून मला जे पूर्वीचे दिवस आठवतात ते वेळ जाण्यासाठी कागदपत्रावर उतरवणं हाच उद्देश. कारण काम करवत नाही, फार चालवत नाही. रिकाम्या डोक्यात नाही नाही ते विचार येतात. त्यांना लांब ठेवण्यासाठी हा साधा, सोपा व आवडीचा उपाय. मी या वहीत लिहायला घेतले तेव्हा मनात विचार आला. मी हे कशासाठी लिहित आहे ? कुणासाठी लिहित आहे? सर्वजण आपापल्या कामात, हे वाचायला कुणाला सवड आहे ? पण मी हे फक्त माझ्यासाठी लिहित आहे व मी हे सर्व सरस्वतीला सांगत आहे. कारण तिच्यामुळेच मी लिहायला व वाचायला शिकले. त्याचा मला किती उपयोग होतो हे मी तिलाच सांगते. बाळूने माझ्या खोलीत सरस्वतीचा मोठा फोटो लावला आहे. तिला सर्व सांगताना माझे मन हलके होते व कुणाशी तरी खूप गप्पा मारल्याचे समाधान मिळते. आता७४ वर्षे झाली. कुणी सांगावं मी काही वर्षांनी लिहायचे विसरले तर ? आता बोलायला कुणी नाही म्हणून बोलणे खूपच कमी झालं आहे. तेच मी कागदाशी लिहिते, बोलते एवढाच उद्देश. लिहायचे विसरले तर मग तेही बंद होईल. माणसाच्या आयुष्यात काही होऊ शकते. माझ्या आईने दहा मुलांना जन्माला घातले. पण मरायच्या आधी तिला एकही मूल आठवत नव्हते. माणसाला सोसत व गुदमरत जगायला लागलं की माणसाच्या मनावर असा परिणाम होतो तो टाळण्यासाठी मी लिहिते आहे, मन मोकळे करते. मला ७३ वे वर्ष लागले. वाढदिवस खूप थाटात झाला. मेघानी गाण्याचा कार्यक्रम ठेवला. तेव्हा मी किती सुखी आहे व तृप्त आहे हे सांगणारी कविता गानू मॅडम यांनी माझ्यावर लिहून भेट दिली. सात दशके दोन वर्षे पूर्ण केलीत तुम्ही । दोन दशके आठ वर्षे स्वागतास उभी । कृतार्थ माता सदा करितसे संस्काराची वर्षा । तची अपत्ये तिलाच देती कर्तृत्वाचा घडा । ओसंडत जाऊदे घडा हा असाच क्षण अन् क्षणी ॥१॥ वात्सल्याच्या मेघातून त्या भरती संवेदना । तिच्यात न्हाऊन जाई जेव्हा गरीब दुबळी प्रजा । शरीर थकले तरी मनाला कोंब फुटू लागती । लक्ष्मणाच्या ऊर्मिलेचा त्याग नावाजती ।। मातृत्वाच्या रूपामध्ये तोच नांदतो जगी । त्या त्यागाची तमा न बाटे संतोषच जन मनी । स्वास्थ्य मनाचे घेऊन येवो | हर दिन अन हर निशा । रिद्धी सिद्धी घरात नांदो हीच असे मनिषा |॥२॥ उर्मिला ल. देशपांडे