पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जानेवारीत थंडीचा काटा अंगावर मोहरत जातो. संध्याकाळच्या सावल्या गडद होऊ लागल्या की, जागोजागी शेकोट्या पेटू लागतात. ज्यांना अंगभर कपडे, लोकरीचे उबदार स्वेटर असतात, त्यांना या शेकोट्यांची गरज कोणती? अशांसाठी 'कॅम्प-फायर' ही आनंदाची पर्वणी. सहलीची हवा याच दिवसांत लहरू लागते. मग शेकोटी, हात शेकत गाणी, नृत्य, खेळ आलेच. पण जिथे अंगभरून कपड्यांची वाण असते, तिथे शेकोटीची ऊब घेत रात्र जागवावी लागते.
 डिसेंबर अखेरच्या थंडीतच काटेरी हलव्याची याद येऊ लागते. अलीकडे पैसे टाकले की, काटेरी हलवा मिळतो. पण पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या संक्रांतीची आठवण दर वर्षी मनातून उजळतेच. स्वतः हलवा तयार करून तो सुरेखशा नक्षीदार कागदी डब्यातून गुरुजन, मित्र-मैत्रिणींना वाटण्याचा केवढा उत्साह असे! मग एक नाक मुरडून, हलक्या आवाजातील कुजबुज पण...
 'त्या मिनूच्या हलव्याला काटाच फुटला नाही. गोलमटोल ती तसाच हलवाही.'
 'नुसती अभ्यासात हुशार. पण छान हलवा कुठे जमतोय? नि पोळ्यांचे तर आशिया-आफ्रिकेचे नकाशे.'
 'उषीला आई नाहीये ग. पण घरचं सगळं आवरते. तिच्या हलव्याला इतके सुरेख नि नाजूक काटे आलेयत, आणि अग खसखशीवर केलाय हलवा.'
 जानेवारी लागण्यापूर्वी आईमागे भुणभुण सुरू होई. छोट्या बादलीतली चिमुकली शेगडी, त्यावर स्वच्छ तवा, हलवायला दोन शुभ्र, तलम, सुती फडकी, असा

१४२ / रुणझुणत्या पाखरा