पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'सात बहिणींच्या तनामनापर्यंत', कविताच ती...' 'कुलाई खोरे: देवभूमी,' 'अनाघ्रात समुद्रानुभव' या आणि अशा स्वरूपाच्या प्रवासवर्णनांत आपण त्या त्या स्थलप्रदेशांची नवी माहिती किंवा तिथला इतिहास समजून घ्यायचा नसतो. तर त्या त्या स्थलप्रदेशाचे व्यक्तिमत्त्व आणि त्याला भेट देणाऱ्या डॉ. शैला लोहियांचे व्यक्तिमत्त्व यांच्यातील अद्वैत साधणारी अनुभवविशिष्टतां अनुभवायची असते. या प्रकारच्या ललितगद्यांत प्रवासकालीन अनुभवांचा स्मृतिरुप संस्कार जागवून स्थलप्रदेशाचे भावचित्र आकाराला येते तेव्हा स्वाभाविकपणे डॉ. शैला लोहियांच्या अनुभूतीला त्या त्या स्थलप्रदेशाच्या वस्तुनिष्ठ वर्णनापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होते. डॉ. शैला लोहियांनी आपल्या प्रवासवर्णनपर लेखांचे स्वतंत्र पुस्तक केले पाहिजे इतके ते पृथगात्म आणि महत्त्वाचे आहेत एवढेच सुचवून ठेवतो.
 उर्दूत गझल मधील सर्वात आवडलेल्या शेराला हासिले गझल शेर म्हणतात. 'पुनव... पौर्णिमा', 'विधिव्रतांतली सामूहिकता', 'हिंदू जीवनदृष्टी', 'भादवाः कृषी समृद्धीचा', 'राखी: एक बंधन', 'आई म्हणोनी कोणी', 'पापड कुरुड्यांचे दिवस', 'दीपोत्सव', 'भूमिकन्या', 'दशम्या धपाट्याच्या चवींची वेळा आवस', 'रंगवल्ली... रांगोळी', 'घट' हे या संग्रहातले हासिले गझल शेर आहेत. अक्षरशः नादावून टाकले त्यांनी मला. पण त्याच बरोबर हेही जाणवले की त्यांचा आनंद कसा घ्यायचा हे समजून सांगायला दुर्गा भागवत किंवा द. ग. गोडसे हवे होते. किंवा आत्ताच्या आता हे लेख घेऊन डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. तारा भवाळकर किंवा डॉ. तारा परांजप्यांकडे जावे आणि या लेखांचे कौतुक त्यांच्या कडून ऐकावे.
 संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ताजमहाल पाहून आल्यासारखे होते. यातल्या व्यक्ती, स्थळ, विचार, लोकसाहित्य धूसरपणे आठवत राहते पण आपल्या मनात वेगळंच चांदणे पडलेले असते. ते असते डॉ. शैला लोहियांच्या संवेदनशीलतेचे, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या काव्यात्म प्रतिभेचे. आपल्या नकळत आपल्यावरचा ताबा या लेखांनी काढून घेतलेला असतो. उत्कृष्ट कलाकृतीकडून आणखी कोणती अपेक्षा करायची असते?

- प्रा. विश्वास वसेकर

रुणझुणत्या पाखरा /अकरा