पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेमुसलमानांनी पाकिस्तानचे पंचमस्तंभ म्हणून भारतात वावरावे असे वाटत होते आणि तरीही भारतीय मुसलमानांनी भारताशी एकनिष्ठ राहिले पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतल्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. एक तर माउन्टबॅटननी त्यांच्या काँग्रेसबरोबर दोन्ही देशांतील अल्पसंख्यांकांच्याबाबत समान सूडबुद्धिरहित धोरण आखण्याबाबतीत करार करायला प्रवृत्त केले होते. दुसरे असे की पाकिस्तानातही अल्पसंख्यांक होते. भारतीय मुसलमानांच्या निष्ठेप्रमाणे त्यांच्याही निष्ठेचा प्रश्न उपस्थित होत होता आणि तिसरी गोष्ट अशी की एकदा वेगळे राष्ट्र झाल्यानंतर जीनांच्या आधीच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नैतिक पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. जीनांची १३ जुलै १९४७ पासूनची सगळी निवेदने आणि उद्दिष्टांचे डावपेच यांच्यातील विसंगती एकदा नजरेखालून घातली की त्यांचे राजकीय हेतू स्पष्ट होतात. सुरुवातीला पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राज्य होणार किंवा पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना समान अधिकार मिळतील अथवा भारतीय मुसलमानांनी भारताशी एकनिष्ठ असले पाहिजे ही निवेदने त्यांनी त्यांची राजकीय उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून केलेली आहेत. फाळणीमुळे हिंदू जनमत प्रक्षुब्ध झाले होते. लीगने पद्धतशीरपणे केलेल्या हिंदूविरोधी दंगलींमुळे हिंदूंच्या कट्तेत भरच पडली होती. फाळणीनंतर हिंद भारतीय मुसलमानांवर तुटून पडतील ही जीनांची भीती होती. हिंदूंचे हे संभाव्य प्रतिप्रहार सौम्य करणे हे जीनांच्या वरील अनेक घोषणांचे एक प्रमुख उद्दिष्ट होते. (खलिकुत्झमान या तर्काला दुजोरा देतात. पहा - पृ. ३९३) आणि ही निवेदने करीत असतानाच भारताचे विघटन करण्याच्या उद्दिष्टाने जीना पावले टाकीत होते.

 प्रथम त्यांनी काँग्रेस आणि लीग यांचा अलिखित करार मोडून जुनागड पाकिस्तानात सामील करून घेतले. संस्थानांच्या सामिलीकरणाबाबत माऊन्टबॅटन यांच्या मध्यस्थीने काही समान धोरणाला काँग्रेसने लीगबरोबर मान्यता दिली होती आणि हंगामी सरकारातील मुस्लिम मंत्री सरदार अब्दुल रब निस्तार यांनी लीगतर्फे कराराला संमती दिली होती. एकमेकांच्या प्रदेशातील संस्थानांना आपल्यात सामील न करून घेणे हे एक त्या करारातील कलम होते. तसेच लोकसंख्येचे धार्मिक स्वरूप सामिलीकरणाबाबत विचारात घ्यावे असेही ठरले होते. जुनागड सामील करून घेताना जीनांनी करारातील दोन्हीही कलमे धुडकावून लावली आहेत. भौगोलिकदृष्ट्या जुनागड भारतीय प्रदेशांनी वेढलेले होते आणि तेथील ८०% प्रजा हिंदू होती. या बाबतीत जीनांनी आणि लियाकतअली खानांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी करण्याचेही नाकारले. (पहा - 'Mission with Mountbatten' by Allan Johnson Campbell.') मागाहून काश्मीर भारतात सामील झाले तेव्हा स्वतः धुडकावून लावलेल्या कराराच्या कलमांची त्यांना आठवण झाली. 'जुनागडचे सामिलीकरण आपण का करून घेतलेत' या माउंटबॅटन यांच्या प्रश्नाला 'मला या सामिलीकरणाची कल्पना देण्यात आली नाही' असे जीनांनी उत्तर दिले. (पहा - 'Mission with Mountbatten') जुनागड घेण्यात जीनांचे विविध हेतू होते. भारतीय नेत्यांचा भारत एकसंध करण्याचा निश्चय किती कणखर आहे. याची त्यांना जुनागडच्या निमित्ताने चाचणी घ्यायची होती. जुनागड ही जीनांनी एक टेस्ट केस बनविली होती. जुनागड आपल्याकडे राहील आणि काश्मीर, टोळीवाल्यांच्या मदतीने, भारतापासून आपण हिसकावून घेऊ शकू असे त्यांना वाटत होते. त्याचबरोबर

भारत - पाक संबंध/९३